मुंबईतील चालू असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरण (Cement Concreting) रस्त्यांच्या कामांबाबत विधानसभेत मुंबईच्या आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विशेष बैठक बोलावली. या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अध्यक्ष नार्वेकर यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना ठोस निर्देश दिले. रस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी आणि नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना स्पष्ट सूचना दिल्या
- ३१ मे २०२५ पर्यंत सर्व रस्त्यांची कामे पूर्ण करा. यासाठी जास्तीचे मनुष्यबळ वापरून कामाला गती द्यावी.
- नव्याने कोणतेही रस्ते उघडू नयेत. सध्याची खणलेली कामे पूर्ण झाल्याशिवाय नवीन काम सुरू करू नये.
- एप्रिल अखेरीस पाठपुरावा बैठक. रस्त्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एप्रिलच्या शेवटी बैठक घेतली जाईल.
- अतिरिक्त आयुक्तांच्या नेतृत्वाखाली समन्वय. महापालिका आणि युटीलिटी विभागांमध्ये समन्वयासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठका होतील.
- प्रत्येक रस्त्याचे वेळापत्रक. सहाय्यक आयुक्त स्तरावर प्रत्येक रस्त्याचे शेड्युल तयार केले जाईल.
(हेही वाचा Malegaon Blast प्रकरणात कर्नल प्रसाद पुरोहितांना सैन्य अधिकाऱ्यांनी गोवले; abinewz.com चा धक्कादायक खुलासा)
मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची मदत?
बैठकीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी आवश्यकता भासल्यास रस्त्यांच्या दर्जेदार बांधकामासाठी भारत सरकारच्या मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस (MES) ची मदत घेण्याचा प्रस्ताव मांडला. “मुंबईतील रस्त्यांची कामे मे महिन्यापूर्वी पूर्ण व्हावीत, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत,” अशी मागणी त्यांनी केली. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनीही या मागणीला पाठिंबा देत कामात पारदर्शकता आणि गती आणण्याचे निर्देश दिले.
मुंबईतील सिमेंट काँक्रीटीकरण (Cement Concreting) रस्त्यांच्या कामांमुळे वाहतूक कोंडी, धूळ आणि अपूर्ण रस्त्यांमुळे मुंबईकरांना होणारा त्रास यावर आमदारांनी विधानसभेत आक्षेप घेतला होता. यापूर्वीच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित झाला होता, परंतु ठोस प्रगती न झाल्याने आमदारांनी पुन्हा आवाज उठवला. या पार्श्वभूमीवर ही विशेष बैठक घेण्यात आली.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले, “मुंबईकरांना दर्जेदार रस्ते देणे हे आमचे कर्तव्य आहे. नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनीही महापालिकेला कामाची गती आणि गुणवत्ता यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. या बैठकीमुळे रस्ते कामांना गती मिळेल आणि मुंबईकरांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
एप्रिल अखेरीस होणाऱ्या पाठपुरावा बैठकीत कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल. ३१ मे ही अंतिम मुदत ठरल्याने महापालिकेवर जबाबदारी वाढली आहे. या निर्णयांमुळे मुंबईतील रस्त्यांचा प्रश्न (Cement Concreting) सुटण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले आहे.