महिलांना शैक्षणिक आणि आर्थिकदृष्टया सक्षम करण्यासाठी एसएनडीटी विद्यापीठाचा वाटा मोठा आहे. शंभर वर्षांहून अधिक काळ झालेल्या एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र येत्या जूनपासून चंद्रपूर जिल्हयातील बल्लारपूर येथे सुरु करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याविषयी सातत्याने पाठपुरावा केला होता.
( हेही वाचा : मुंबई ते बेलापूर प्रवास होणार सुसाट! वॉटर टॅक्सी १५ दिवसात सुरू होणार; किती असणार भाडे?)
येणाऱ्या शैक्षणिक वर्षांपासून येथे रोजगारभिमुख आणि कौशल्यआधारीत अभ्यासक्रम सुरु करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पाटील यांच्या निवासस्थानी मंगळवारी यासंदर्भात बैठक झाली व निर्णय घेण्यात आला.
एस.एन.डी.टी.अर्थात श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचे केंद्र चंद्रपूर जिल्हयातील बल्लारपूर येथे सुरु करण्यासंदर्भात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला चंद्रपूर जिल्हयाचे जिल्हाधिकारी विनय गौडा, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. उज्जवला चक्रदेव, उच्च व तंत्रशिक्षण संचालक धनराज माने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले की, एसएनडीटी विद्यापीठाचा आतापर्यंत ७ राज्यांमध्ये विस्तार झालेला आहे. वेगवेगळे शैक्षणिक, रोजगारभिमुख आणि कौशल्यआधारीत अभ्यासक्रमांना आजही मागणी आहे. त्यामुळे चंद्रपूर आणि येथील परिसरातील विद्यार्थीनीना आवश्यक असणारे साधारण १० अभ्यासक्रम या विद्यापीठातून शिकविण्यात येतील. एसएनडीटी विद्यापीठाचे बल्लारपूर येथे केंद्र सुरु करण्यासाठी आवश्यक असणारी जागेची पाहणी, साधनसामुग्री तसेच केंद्र सुरु झाल्यानंतर आवश्यक असणारे मनुष्यबळ, प्रशिक्षित प्राध्यापक याबाबतचा आढावा प्रत्यक्ष घेण्यात येईल.
जूनपासून वर्ग भरणार
शैक्षणिक वर्ष जूनपासून सुरु होत असल्याने प्राथमिक टप्प्यात चंद्रपूर येथे असलेल्या अत्याधुनिक दोन शाळांमध्ये अभ्यासक्रम सुरु करण्यात येतील. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि एसएनडीटी विद्यापीठाने पार केलेली शताब्दी याचा मेळ घालून काही नवीन उपक्रमही विद्यापीठामार्फत सुरु करण्यावर भर देण्यात येईल असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.