मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशातील राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व प्राधिकरणांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केले.
मुंबईच्या पायाभूत सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीना एकाच व्यासपीठावर आणणाऱ्या ‘मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन @ 2034’ या एकदिवसीय परिषदेचे उद्घाटन लोकसभेचे गटनेते खासदार राहुल शेवाळे, अमेरिकेचे राजकीय आणि वाणिज्य दूत ख्रिस्तोफर ब्राऊन, कर्नाटक सरकारचे सल्लागार प्राध्यापक श्रीहरी यांच्या हस्ते झाले.
यावेळी खासदार राहुल शेवाळे यांनी या परिषदेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधांचा दर्जा वाढवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशातील राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व प्राधिकरणांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. आजच्या परिषदेतील तज्ज्ञ मंडळींच्या सूचनांचा अंतर्भाव असणारी श्वेतपत्रिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्हिडिओच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी या परिषदेला शुभेच्छा देत खासदार राहुल शेवाळे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ही परिषद आयोजित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच ही परिषद मुंबई आणि महानगराच्या विकासाला दूरदृष्टी देणारी ठरेल, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
Join Our WhatsApp Community