गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणा एनआयए आणि ईडीच्या माध्यमातून दहशतवादी कारवायांशी संबंधित असलेल्या पीएफआय या संघटनेविरोधात मोठी कारवाई केली आहे. पीएफआयशी संबंधित शंभरपेक्षा जास्त जणांना अटक देखील करण्यात आली आहे. या छापेमारीदरम्यान तपास यंत्रणांच्या हाती महत्वपूर्ण पुरावे लागले असून त्या पुराव्यांच्या आधारे पीएफआय संघटनेवर बंदी आणण्याच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पीएफआयच्या मुसक्या आवळण्यासाठी तयारी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
गृहमंत्रालयाची तयारी सुरू
कुठल्याही संघटनेवर राष्ट्रीय स्तरावर बंदी घालण्यासाठी त्या संघटनेच्या विरोधात भक्कम पुरावे असणे गरजेचे असते. समजा पीएफआयवर बंदी घालण्यात आली आणि या संघटनेकडून बंदीविरोधात न्यायालयात आव्हान देण्यात आले तर बंदी कायम ठेवण्यासाठी न्यायालयात पुरावे सादर करावे लागतात. त्यामुळेच केंद्रीय तपास यंत्रणांना मिळालेले पुरावे एकत्रित करुन बंदीची कारवाई करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने मोर्चंबांधणी सुरू केली आहे.
(हेही वाचाः ‘इतिहासातील खानांची उचकी लागणारे आता कुठल्या बिळात बसले आहेत?’, भाजपचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल)
कारवाई होण्याची शक्यता
गुरुवारी देशातील 15 राज्यांत करण्यात आलेल्या छापेमारीमध्ये तपास यंत्रणांना पीएफआय संघटना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे पुरावे हाती लागले आहेत. त्यामुळे या पुराव्यांच्या आधारे पीएफआयवर लवकरच कारवाई होऊ शकते.
कारवाईचे आदेश
पीएफआयवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि एनआयए प्रमुख यांच्यासोबत बैठक झाली. यामध्ये पीएफआयविरोधात गोळा करण्यात आलेल्या कारवायांचा आढावा घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच याबाबत कायदेशीर सल्ला घेण्यात येत असल्याचेही सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community