केंद्राने तपास केल्यास राज्यात फटाक्याची माळ लागेल! – राज ठाकरे

136

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बमुळे राज्यात खळबळ उडाली असून, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या सर्व प्रकरणाची चौकशी केंद्राने करायला हवे, अशी मागणी केली आहे. केंद्राने तपास केल्यास राज्यात फटाक्याची माळ लागेल, असे भाकीत राज ठाकरे यांनी केले. यामध्ये कोण कोण आता जातील हे कळणार देखील नाही. धमकी देणारा माणूस आदराने बोलतो का? गुजराती माणूस जसा हिंदी बोलतो, तसा टोन त्या पत्राचा होता, असे देखील राज ठाकरे म्हणाले. जो विचार अतिरेकी करतात तो विचार करायला पोलिसांना भाग पाडले, हे कुणी भाग पाडले? याचा शोध घ्यायला हवा अन्यथा उद्या सर्वांच्या घराबाहेर गाड्या लागतील, असे देखील राज ठाकरे म्हणाले.

पोलीस बॉम्ब ठेवतात, हे साधे प्रकरण नाही, अराजकाकडे जाऊ!

मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटींचे टार्गेट दिले होते. गृहमंत्री हा राज्याचा असतो राज्यात शहर किती आणि त्यांना कितीचे टार्गेट देण्यात आले? असा सवाल देखील राज ठाकरे यांनी केला आहे. आपण मूळ विषय विसरत आहोत. सुशांत सिंग प्रकरण बाजूला राहिले आणि लोक मूळ विषय विसरून जातो. अंबानींच्या घराजवळ बॉम्बची गाडी ठेवण्यात आली. आजपर्यंत मी काय सगळेच असा विचार करत होतो की, बॉम्ब अतिरेकी ठेवतात. पण, बॉम्ब पोलीस ठेवतात, असं आपण कधी ऐकलेलं नाही. पोलीस बॉम्ब ठेवतात, हे साधे प्रकरण नाही, या प्रकरणी केंद्राने तातडीने चौकशी करून यातील जे कोणी आहेत, त्यांचे चेहरे उघड केले पाहिजे, धक्कादायक चेहरे समोर येतील आणि जर केंद्राने याकडे दुर्लक्ष केले तर आपण अराजकाकडे जावू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. यात वाझेंना अटक झाली. त्यांची चौकशी सुरू आहे. परमबीर सिंग यांना त्यांच्या पदावरून का हटवलं? त्यांची बदली का केली गेली? हे अजून सरकारने सांगितलेलं नाही. सिंग यांचा काही संबंध होता का? त्यांचा त्यात सहभाग होता का? त्यांना त्या पदावरून बाजूला का केलं गेलं? जर त्यांचा सहभाग होता, तर मग त्यांची चौकशी का केली नाही? त्यांची बदली का केली गेली? सरकारने अंगावर आलेली गोष्ट दुसऱ्याच्या खांद्यावर टाकली, अशी टीका राज यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

(हेही वाचा : लेटरबॉम्बनंतर महाआघाडीचे मंत्री भूमिगत!)

वाझे हा मुख्यमंत्र्यांच्या जवळचा माणूस!

शिवसेनेत प्रवेश करताना सचिन वाझेला कोण घेऊन गेले होते. तसेच नुकतंच फडणवीस देखील म्हणाले की, वाझेला पुन्हा पोलीस दलात घेण्यासाठी फोन केला गेला. त्यातून असे दिसते हा वाझे शिवसेनेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांचा जवळचा माणूस आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुकेश अंबानी यांचे मधुर संबंध आहेत. त्यांच्याकडे पोलीस पैसे खायला जातील का? मात्र यामध्ये कुणाचा तरी इंटरेस्ट असणार त्यामुळे कुणीतरी सांगितल्या शिवाय वाझे गाडी ठेवेल का? असा सवाल देखील राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.