मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठणाच्या आंदोलनावरुन राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. या अटकेत असताना, आपल्यावर अनेक अन्याय झाले. मागासवर्गीय म्हणून दुय्यम वागणूक दिल्याचे नवनीत राणा म्हणाल्या. तसेच, पाणीसुद्धा दिले नाही, वाॅशरुमही वापरायला दिले गेले नसल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर, नवनीत राणा यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार केंद्राकडे पत्राद्वारे केली आहे. यावर आता केंद्राने दखल घेत, 23 मे रोजी या पत्रावर सुनावणी करणार असल्याचे म्हटले आहे.
तक्रारींवर होणार सुनावणी
नवनीत राणा यांनी अटकेत असताना, मिळालेल्या वागणूकीचे तक्रार करणारे पत्र केंद्राला दिले. या पत्राची केंद्राकडून दखल घेण्यात आली आहे. संसदेच्या विशेषाधिकार समितीसमोर नवनीत राणा यांच्या पत्राची सुनावणी केली जाणार आहे. नवनीत राणांनी केलेल्या तक्रारींवर 23 मे रोजी सुनावणी केली जाणार आहे.
राणा दाम्पत्याच्या अडचणींत वाढ
एकीकडे बीएमसीने राणा दाम्पत्याला नोटीस दिली आहे, तर दुसरीकडे न्यायालयाकडूनही राणा दाम्पत्याला नोटीस पाठवण्यात आली आहे. माध्यमांशी बोलण्यास बंदी असतानाही, वक्तव्य केल्यामुळे ही नोटीस न्यायालयाकडून राणा दाम्पत्याला देण्यात आली आहे. 18मे पर्यंत बाजू मांडण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. रविवारी रुग्णालयातून बाहेर येताच, नवनीत राणा यांनी वक्तव्ये केली. तसेच, मुख्यमंत्र्यांना निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले. नवनीत राणांनी केलेल्या या वक्तव्यांमुळे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयाच्या शर्तींचे उल्लंघन केल्याचे सांगितले होते.