‘सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसह चारही नगरपंचायतीमध्ये सत्ता भाजपाचीच’

128

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आचारसंहिता सुरू असलेल्या जिल्हा बँक व चारही नगरपंचायतमध्ये भारतीय जनता पक्षाचा एकतर्फी विजय होणार आहे. सामाजिक, विधायक, शैक्षणिक कार्य नसलेले शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येऊन आमच्या विरोधात लढत आहेत. केवळ राजकीय टीका करून विनाकारण विरोध करण्याचा कार्यक्रम या तिन्ही पक्षाचा आहे. त्यामुळे सुज्ञ मतदार पुन्हा भाजपलाच विजयी करणार, असा विश्वास केंद्रीय लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

‘१०० टक्के मतदारांनी भाजपला मत द्यावे’

पडवे येथील एस. एस. पी. एम. मेडिकल कॉलेज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री राणे बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, डॉ. मिलिंद कुलकर्णी, संदीप कुडतरकर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना राणे यांनी, मागील पाच वर्षात कुडाळ, वाभवे-वैभववाडी व जामसांडे-देवगड येथे भाजपची सत्ता होती. तेथे भाजपने विकासाची कामे केली आहेत. आरोग्य क्षेत्रात सुद्धा काम केले आहे. कोरोना काळात रुग्णांना सेवा सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. याउलट राज्यात सत्तारूढ असलेल्या राजकीय पक्षांनी कोरोना काळात अपुऱ्या रुग्णसेवा दिल्या. जे रुग्ण कोरोनामुळे दगावले त्याला ठाकरे सरकार जबाबदार आहे. त्यामुळे निवडणुका असलेल्या नगरपंचायत क्षेत्रातील १०० टक्के मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन यावेळी राणे यांनी केले.

(हेही वाचा – शिवसेनेच्या मुळावर उठलेले अनिल परब गद्दार! कदमांचा परबांवर हल्लोबोल)

भ्रष्टाचाराचे आरोप असलेले विरोधी पॅनेलचे प्रमुख

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीबाबत बोलताना राणे यांनी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्यावर टीका केली. राज्यात कुठेही भाजपने बॅंक किंवा साखर कारखाना बुडविल्याचे उदाहरण नाही. ते काम कोणत्या पक्षाने केले आहे, हे जगजाहीर आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत आमच्या विरोधी असलेल्या पॅनेलचे प्रमुख असलेल्या व्यक्तीने संचयनीमध्ये अफरातफर केली आहे. यासाठी जेलमध्ये गेले आहेत. याबाबत न्यायालयात केस पेंडिंग आहे. याबाबत आपण लवकरच वकील देणार आहोत. अशाप्रकारे भ्रष्टाचाराचे आरोप असलेले विरोधी पॅनेलचे प्रमुख आहे, असा आरोप केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.