राज्यात झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळल्याने राज्य सरकारने तात्काळ प्राथमिक खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. पुरंदर तालुक्यात सापडलेल्या झिका व्हायरसच्या रुग्णाला भेटायला केंद्रीय टीम जाणार आहे. त्यांच्याकडून राज्य सरकारला सूचना दिल्या जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. झिका व्हायरसचे इतरत्र संक्रमण झालेले नसून घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे टोपे यांनी म्हटले आहे.
टोपेंनी केल्या सूचना!
पुरंदर तालुक्यात झिका व्हायरसचा रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. कोरोना पाठोपाठ आता झिका व्हायरसचे संकट महाराष्ट्रासमोर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर झिका व्हायरसला घाबरून न जाता काळजी घेण्याची गरज असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे. पावसाचे पाणी साठू देऊ नये, भांड्यात साठलेले पाणी वेळोवेळी बदलावे, भांडी कोरडी ठेवावीत आणि आपल्या घराच्या परिसरात पाणी साचणार नाही, याची नागरिकांनी खबरदारी घ्यावी, अंगदुखी, डोळे लाल होणे, अशी या व्हायरसची लक्षणे आहेत. मात्र झिका व्हायरसला घाबरुन जाण्याची गरज नाही. राज्यात व्हायरसचे संक्रमण झालेले नाही. यासाठी प्रतिबंधात्मक उपाय राज्य सरकार करत आहेत, असेही टोपेंनी सांगितले.
(हेही वाचा : आता पाठ्यपुस्तकातूनही होतोय ख्रिस्ती धर्मप्रसार!)
केंद्राकडून लसींचा पुरेसा साठा नाही!
अधिकाधिक लोकांचे लसींचे दोन डोस लवकरात लवकार पूर्ण करण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे. त्यांना वेळेत दुसरी लस उपलब्ध करून देण्यासही प्राधान्य दिले जात असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. कोरोना संक्रमण अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये लसींचे प्रमाण वाढवून देण्यात यावे, अशा सूचना नोडल अधिकाऱ्यांना केल्या आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये लसीकरण कसे वाढवता येईल, यासाठी कार्यवाही करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले. मुंबईत लसीचा दुसरा डोस मिळत नसून केंद्र सरकारकडून पुरेशा प्रमाणात लसी उपलब्ध होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबतची सर्व माहिती पोर्टलवर उपलब्ध असून लसींचा पुरवठा वाढवण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी माध्यमांना सांगितले. पुढे सणासुदीचा काळ सुरु होत असून लवकरात लवकर अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community