शरद पवारांनी भुजबळांना बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून फोडून काँग्रेसमध्ये घेतले. त्यांना उपमुख्यमंत्री केले. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर त्यांना पहिले प्रदेशाध्यक्ष केले, पण तेलगी घोटाळ्यात त्यांचा राजीनामा घेतला या मुद्द्यावरून छगन भुजबळांनी पवारांचे वाभाडे काढले. अब्दुल करीम तेलगीला मी स्टॅम्प घोटाळ्यात अटक केली. पण तरीदेखील पवारांनी अचानक मला बोलवून माझा राजीनामा घेतला. त्यावेळी प्रफुल्ल पटेल जवळ बसले होते. झी न्यूज कंपनीच्या सुभाष गोयल यांनी फोन केला होता. पण त्यांचे देखील पवारांनी ऐकले नाही. माझा राजीनामा घेतला. सीबीआयच्या चार्जशीट मध्ये माझे नाव देखील नव्हते तरी देखील पवारांनी माझे ऐकले नाही. वास्तविक खुद्द पवारांवर देखील त्यावेळी भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. सदाशिवराव तिनईकरांपासून ते खैरनारांपर्यंत अनेकांनी पवारांवर आरोप केले. पण स्वतः पवारांनी कधी राजीनामा दिला नाही. माझा मात्र राजीनामा घेतला हा माझ्यावर अन्याय होता, असा घणाघात मंत्री छगन भुजबळ यांनी केला.
महाराष्ट्राच्या सत्तेची वाट देखील स्वतः पवारांनीच अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांना दाखवली आणि आज ते स्वतःच फिरले. आमच्याविरुद्ध आमच्याच मतदारसंघातून काहीबाही बोलू लागले. ते अजित पवारांविरुद्ध बोलत नाहीत पण आमच्या सारख्या सहकार्यांविरुद्ध बोलतात. येवल्यात येऊन त्यांनी मतदारांची माफी मागितली. पण पवार साहेब तुम्ही माफी तरी किती जणांचे मागणार 54 आमदारांच्या मतदारसंघात जाऊन तुम्हाला माफी मागावी लागेल, असा टोला भुजबळ यांनी शरद पवारांना लगावला. पवारांनी बैठका घेतल्या. पहिल्या बैठकीत छगन भुजबळ, दुसऱ्या बैठकीत धनजंय मुंडे, तिसरा नंबर हसन मुश्रीफ यांचा. इकडून गाडी बारामतीहून फिरून आली की अजितदादा आमचे नेते आहेत. आमच्याविरोधात मीटिंग झाल्यानंतर बारामतीचा प्रश्न आला की अजित पवार आमचे नेते आहेत असं शरद पवार आणि सुप्रिया सुळे म्हणणार. मग अजित पवारांना उपमुख्यमंत्री म्हणून मान्यता देऊन टाका आणि मिटवून टाका भांडण, नेते आहेत ना तुमचे!” असंही छगन भुजबळ म्हणाले.
Join Our WhatsApp Community