महापालिकेच्यावतीने बांधण्यात आलेल्या चैत्यभूमीवर व्हयूविंग गॅलरीला माता रमाबाई आंबेडकर यांचे नाव देण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्यानंतर याबाबतच्या नामकरणाची मागणी सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे जी-उत्तर विभाग कार्यालयाकडे केली आहे.
लवकरच नामफलक लावला जाणार
याचे लोकार्पण करताना आदित्य ठाकरे यांनी माता रमाबाई व्ह्यूविंग गॅलरी अशाप्रकारे उल्लेख केला असला, तरी प्रत्यक्षात नामकरणाच्या प्रस्तावाला जी-उत्तर प्रभाग समिती आणि स्थापत्य समितीची आणि सभागृहाची मान्यता न मिळाल्याने याच्या नावाची पाटी अद्याप तयार करण्यात आलेली नाही. परंतु या नामकरणाला मंजुरी मिळाल्यानंतर याबाबतचा नामफलक लावला जाईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
(हेही वाचाः निवडणूक कधीही होऊदे… नगरसेवक असा करत आहेत ‘छुपा’ प्रचार)
नामकरणाबाबत ठरावाची सूचना
दादर चौपाटी येथे ९ फेब्रुवारी २०२२ रोजी लोकार्पण झालेल्या ‘व्ह्यूविंग डेक’चे नामकरण ‘माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्ह्यूविंग डेक’ असे करण्याचे निर्देश राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिका प्रशासनाला लोकार्पण करतेवेळी दिले आहेत. त्यानुसार नामकरण करण्याची कार्यवाही यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. पर्यावरण मंत्र्यांच्या निर्देशांनुसार सभागृह नेत्या व स्थानिक नगरसेविका विशाखा राऊत यांनी ११ फेब्रुवारी २०२२ रोजी ‘जी-उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांना नामकरण करण्याबाबत ठरावाची सूचना देणारे पत्र दिले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या प्रचलित पद्धतीनुसार प्रभाग समितीच्या मान्यतेनंतर लवकरच जाहीर कार्यक्रमादरम्यान अधिकृतपणे नामकरण केले जाईल, असे जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी स्पष्ट केले आहे.
(हेही वाचाः मुख्यमंत्र्यांवर आरोप होताच शिवसेनेने प्रवक्त्यांना केले जागे!)
Join Our WhatsApp Community