चंदीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव, अर्थमंत्र्यांकडून नामफलकाचे अनावरण

निर्मला सीतारामन यांनी केले नामफलकाचे अनावरण

104

चंदीगडच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला आता शहीद भगतसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हटले जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी पंजाब आणि हरियाणाच्या राज्यपालांच्या उपस्थितीत नवीन नावाच्या फलकाचे अनावरण केले. शहीद भगतसिंग यांच्या 115 व्या जयंतीनिमित्त हा सोहळा पार पडला.

यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंदीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देऊन भगतसिंग यांना खरी श्रद्धांजली अर्पण केली आहे. सोबतच देशातील तरुणांना शहीदांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची प्रेरणाही दिली आहे. केंद्र सरकार ‘सबका साथ सबका विकास’ चा नारा देत चालत आहे. हरियाणा, पंजाब आणि चंदीगडला विमानतळाचा विस्तार आणि लोकांच्या हितासाठी येथे करण्यात येणारे बदल यामध्ये पूर्ण सहकार्य केले जाईल अशी ग्वाही सीतारामन यांनी दिली.

(हेही वाचा – ‘या’ तारखेला ठरणार शिंदे गट पात्र की अपात्र, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी)

यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी चंदीगडहून लंडन आणि शिकागोसह अनेक देश आणि शहरांसाठी उड्डाणे सुरू करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनीसह अनेक देश आहेत जिथे मिनी पंजाब बनले आहेत. केंद्र सरकारने चंदीगडहून थेट विमानसेवा सुरू केल्यास पंजाबच्या प्रवाशांनाही त्याचा फायदा होईल. तर हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी हरियाणा आणि पंजाबने मिळून येथे शहीद भगतसिंग यांचा भव्य पुतळा उभारावा, अशी सूचना केली. याप्रकरणी केंद्र सरकारने सहकार्य करावे, असे आवाहनही चौटाला यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबर रोजी त्यांच्या ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमात चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव स्वातंत्र्य सेनानी शहीद भगतसिंग यांच्या नावावर करण्याची घोषणा केली होती. यापूर्वी पंजाब आणि हरियाणामध्ये विमानतळाच्या नावावरून अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. ऑगस्टमध्ये हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यात झालेल्या बैठकीनंतर विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देण्यावर सहमती झाली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.