शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात आता चांगलीच जुंपली आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर गुलाबराव पाटील यांनी केलेल्या टीकेनंतर त्यांना चंद्रकांत खैरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जर गुलाबरावांनी माफी मागितली नाही तर त्यांचा गळा दाबायला देखील मी मागे पुढे बघणार नाही, असे विधान चंद्रकांत खैरे यांनी केले आहे.
गुलाबरावांची टीका
आदित्य ठाकरे यांचे वय 32 वर्षे आहे तर मी गेल्या 35 वर्षांपासून शिवसनेते आहे. त्यामुळे ते ठाकरेंच्या संपत्तीचे वारसदार होऊ शकतील, पण त्यांच्या विचारांचे नाही. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी आमच्या वयाची आणि अनुभवाची विनाकारण खिल्ली उडवू नये. नाहीतर आम्ही बोलण्यामध्ये खूप कठीण आहोत की त्यांना आवरणं कठीण होईल, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. त्याला चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
(हेही वाचाः ‘आता बोलताना मुख्यमंत्रीपदाचा मास्क तोंडावर नसेल’, दसरा मेळाव्याबाबत उद्धव ठाकरेंचे मोठे विधान)
राग आला तर काहीही करेन- खैरे
गुलाबराव पाटील हे आपण पानटपरीवाला असल्याचे स्वतः सांगतात. पण आता त्याच पानटपरीवाल्याला खोके मिळाल्यानंतर आदित्य ठाकरेंबाबत बोलतात. ठाकरे परिवारामुळे आम्ही आहोत. त्यामुळे गुलाबराव पाटलांची गोधडी काढल्याशिवाय मी राहणार नाही. गुलाबरावांनी माफी मागितली नाही तर मी शांत बसणार नाही. राग आला तर मी काहीही करू शकतो, त्यांचा गळा देखील दाबू शकतो, अशा शब्दांत चंद्रकांत खैरे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर घणाघात केला आहे.
Join Our WhatsApp Community