उद्धव ठाकरे सरकारच्या काळात बदली करून देण्यासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचे पुत्र ऋषीकेश खैरे यांनी पैसे घेतल्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. याबाबतची माहिती गृहविभागाने मागवल्यामुळे चंद्रकांत खैरेंच्या अडचणी वाढणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
बदलीचे हे प्रकरण वन विभागातील एका कर्मचाऱ्याशी संबंधित आहे. त्या महिला कर्मचाऱ्याचा पती आणि ऋषीकेश यांच्यातील हे संभाषण असल्याचे दिसत आहे. त्यात बदलीसाठी २ लाख रुपये दिल्याचा आणि बदलीचे काम झाले नाही, तरीही पैसे परत न मिळाल्याचा उल्लेख केला आहे. परिणामी, समोरची व्यक्ती काम न झाल्याने ऋषीकेश यांना बदलीसाठी दिलेले २ लाख रुपये परत मागत आहे.
विशेष म्हणजे माध्यमांशी बोलताना ऋषीकेश यांनी हा व्यवहार झाल्याची कबुली दिली आहे. कोरोनाच्या आधी काही मित्रांमार्फत एकजण माझ्याकडे बदलीसाठी आला होता. तथापि, आपण त्यांचे पैसे परत देणार आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणातील गांभीर्यता लक्षात घेऊन गृहमंत्रालयाने सविस्तर माहिती मागविल्याचे कळते.
निवडणुकीत मुद्दा गाजणार
शिंदे गटावर नेहमी तोंडसुख घेणाऱ्या चंद्रकांत खैरे यांना कोंडीत पकडण्याची संधी यानिमित्ताने बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपासमोर चालून आली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्याचे सोने करण्याची संधी सत्ताधारी सोडणार नाहीत. परिणामी, मुलाच्या ‘प्रतापा’मुळे खैरेंच्या अडचणी वाढणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
Join Our WhatsApp Community