चंद्रकांत पाटील, आदित्य ठाकरे एकत्र; बाप्पाच्या पालखीचे बनले भोई

171

गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. विशेषतः शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला भाजप, शिंदेगट, मनसेसह लहान पक्षांकडून लक्ष्य केले जात आहे. अशात भाजपचे पहिल्या फळीतील नेते चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे एकाच व्यासपीठावर आल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या.

 ( हेही वाचा : “गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या” मुंबईतील भव्य मिरवणूकांची क्षणचित्रे )

मुंबई पालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच राजकीय वातावरण तापू लागले असताना, गणेश दर्शनाचे निमित्त साधत सर्वच राजकीय पक्षांनी व्यापक संपर्क मोहीम हाती घेतल्याचे पहायला मिळत आहे. अगदी विसर्जन मिरवणुकांनाही नेतेमंडळी आवर्जून हजेरी लावत आहेत. शुक्रवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील पुण्याच्या दौऱ्यावर होते. पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने ते दोघेही समोरासमोर आले.अशावेळी राजकीय वैरत्व विसरून दोघांनीही सोबतीने बाप्पाची पालखी खांद्यावर घेतली. हे चित्र पाहून गणेशभक्तांनी जोरात गणपती बाप्पा मोरया,अशा घोषणा दिल्या.

शिंदेंच्या बंडानंतर शाब्दिक युद्ध

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारालाही पायउतार व्हावे लागले. त्यासाठी भाजपने शिंदेंना मदत केली, हे उघड आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ठाकरे आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगताना दिसत आहे. अशा स्थितीत भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ठाकरे पुत्र एकत्र दिसल्याने साऱ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले. या दोघांनीही राजकीय मतभेद बाजूला ठेवत गणरायाच्या मिरवणुकीत सहभाग घेतला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.