कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. पोटनिवडणुकीचे राजकारण तापत चालले आहे. अशा परिस्थितीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याविषयी थेट काँग्रेसला आॅफर दिल्याने वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
बंटी पाटलांवर आरोप
कोल्हापूर पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसकडून जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण अजूनही २४ तास शिल्लक आहेत. जयश्री जाधव या भाजपच्या होत्या त्यांना परत भाजपमध्ये पाठवा. मी एबी फॉर्म बदलतो आणि ही निवडणूक बिनविरोध करतो, अशी थेट ऑफर चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. खरंत, भाजपमध्ये परत यावे आणि निवडणूक लढवावी, अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी जयश्री जाधव यांना केली होती. पण त्यांचे पती चंद्रकांत जाधव यांनी जो झेंडा हाती घेतला होता, त्याच पक्षातून आपण लढणार असल्याचे जयश्री यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भाजपनेही आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. दरम्यान, ही निवडणूक बंटी पाटील यांच्या अहंकारापायी लादली गेली आहे. ज्या काही निवडणूका येतील त्या मला द्या, असा त्यांचा स्वभाव आहे. गोकुळ निवडणूक, जिल्हा बँक निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक सर्व निवडणुका मला द्या, अशा त्यांच्या स्वभावाने ही निवडणूक लादली गेली, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
(हेही वाचा गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री का झाले नाराज?)
चंद्रकांत पाटलांचे आव्हान
चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर निवडणुक लढवण्याबाबत विचारलं असता त्यांनी, आता तर फक्त सत्यजित कदम लढत आहेत आणि ते विजयी होणारच आहेत. केव्हा तरी मी कसा लढतो हे पाहण्यासाठी एकानं राजीनामा देऊन दाखवा, असं थेट आव्हान त्यांनी दिलं आहे. तसंच, ज्या बंटी पाटलांनी शेत पाइपलाइनचं पाणी नाही आलं तर निवडणूक लढवणार नाही असं म्हटलं होतं त्याचं काय झालं, असा सवालही त्यांनी केला. त्यामुळं ही निवडणूक ५० वर्ष काँग्रेसची व ५ वर्ष भाजपची अशी लढवणार आहोत. आम्ही ५ वर्षात काय केलं हे मांडतो तुम्ही ५० वर्षात काय केलं ते सांगा, असंही ते म्हणाले होते.