राज्याचे मुख्यमंत्री बदलले आहेत का? चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगारांनी संप पुकारला आहे.

सध्या राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी हे संपावर आहेत, महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीन करावे, अशी मागणीआहे. मात्र त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘सरकारच्या वतीने शरद पवार हे केव्हापासून बोलायला लागले? मुख्यमंत्री बदलले आहेत का?’, असा खोचक सवाल विचारला.
सध्या राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांच्या संपामुळे वातावरण बिघडले आहे. संपावरून राज्यातील सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार जुंपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांनी संपाविषयी केलेल्या वक्तव्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदललेत का?,’ असा प्रश्न त्यांनी केला आहे.

(हेही वाचा : हे तर मोदी सरकारला आलेले शहाणपण! सेनेचा हल्लाबोल)

कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्याची हौस नाही

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगारांनी संप पुकारला आहे. ऐन दिवाळीत हा संप सुरू असल्याने सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत. उच्च न्यायालयाने मनाई आदेश काढूनही कामगार संपावर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले होते. ‘एसटी कामगारांचे काही महत्त्वाचे नेते मला येऊन भेटले. त्यांना संप पुढे न्यायचा नाही. पण काही लोकांनी टोकाची भूमिका घेतल्यामुले परिस्थिती बिघडली आहे, असे त्यांचे म्हणणे होत, असे पवार यांनी आज सांगितले. तसेच कामगारांना संपाचा विषय अधिक ताणून न धरण्याचे आवाहनही त्यांनी केले. पवारांच्या याच वक्तव्याचा धागा पकडून पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ‘पवार साहेब सरकारच्या वतीने घोषणा कधीपासून करायला लागले? मुख्यमंत्री बदलले आहेत का? सरकारच्या वतीने उद्धव ठाकरेंनी बोलायला हवे,’ असे पाटील म्हणाले. ‘कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्याची हौस नाही. २९ कामगारांनी आत्महत्या केल्या आहेत. दिवाळीचा तिसरा दिवस उजाडला तरी सरकार त्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही. कामगारांना १७ महिन्यांचा पगार मिळालेला नाही. अवघा अडीच हजार रुपये बोनस देण्यात आला. घरात काम करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आपण पाच हजार रुपये देतो, असा संताप पाटील यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here