देशात लोकशाही, दंडुकेशाही चालणार नाही! चंद्रकांत पाटलांनी ठणकावले

15 दिवसांपूर्वी शिवसेनेने भाजप कार्यालयासमोर आंदोलने केली. त्याआधी काँग्रेसनेही आंदोलने केली. तेव्हा आम्ही अडवले नाही. पोलिसांनी आंदोलकांना आंदोलन करण्यासाठी थोडा वेळ दिला आणि त्यांना घेऊन गेले, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. 

69

तुम्ही वाट्टेल ते लिहिणार आणि त्यावर कुणी रोष व्यक्त करायचा नाही का? देशात लोकशाही आहे. दंडुकेशाही चालणार नाही, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला ठणकावले. शिवसेना भवनासमोर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

शिवसेना भवनासमोर जे झाले ते क्लेशदायक आहे. एका खुर्चीपायी हे होणे हे क्लेशदायक आहे, तुम्ही रोज सामानातून वाट्टेल ते लिहिणार, जे लिहिता त्याला आधारही नसतो. त्यावर निदर्शने करायची नाही का? रोषही व्यक्त करायचा नाही का?, असा सवाल पाटील यांनी केला. काल झालेला राडा हा मुंबई महापालिकेची तयारी वैगरे नव्हती, तो भावनिक प्रश्न होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हिंदुत्वावरील टीका कशी सहन करणार?

तुम्ही हिंदुत्व सोडले म्हणून अंतर निर्माण झाले. तुम्ही हिंदुत्व सोडणार आणि आमच्या हिंदुत्वावर टीका करणार तर कसे सहन होईल? ही लोकशाही आहे. त्यामुळे तुमची दंडुकेशाही नाही चालणार. आंदोलकांच्या हातात दगड, गोटे नव्हते. जे काही असेल ते सीसीटीव्हीत येईलच, असे सांगतानाच 15 दिवसांपूर्वी शिवसेनेने भाजप कार्यालयासमोर आंदोलने केली. त्याआधी काँग्रेसनेही आंदोलने केली. तेव्हा आम्ही अडवले नाही. पोलिस आले. आंदोलकांना आंदोलन करण्यासाठी थोडा वेळ दिला आणि त्यांना घेऊन गेले, असे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा : भाजपला शिवप्रसाद मिळाला, शिवभोजन देण्याची वेळ आणू नका! )

शिवसेना भवनावर आंदोलन करायचे नाही! – संजय राऊत 

शिवसेना भवनासमोर आंदोलन करायचेच नाही, महाराष्ट्रात आणि देशातशिवसेना भवन हे अपवाद आहे. शिवसेना भवन ही अशी वास्तू आहे जिच्या समोरुन जाताना प्रत्येकाची मान बाळासाहेबांकडे पाहून विनम्रपणे खाली झुकते. तुम्ही तिथे आंदोलन करु नका, आंदोलनासाठी वेगळ्या जागा खूप आहेत, अशा शब्दात राऊत यांनी भाजपला एकप्रकारे इशाराच दिला. शिवसेना गुंडगिरी करते. पण शिवसेनेला सत्तेचा माज नाही. काल जर सत्तेचा माज दाखवत राडा झाला असता तर वेगळे चित्र दिसले असते. गुंडगिरी म्हणत असताल तर कुणी शिवसेना भवनावर, मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतिक असलेल्या, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या वास्तूमध्ये बसून राज्याचा कारभार हाकला, त्या वास्तूच्या दिशेने कुणी चाल करत असेल तर होय, आम्ही गुंड आहोत. आम्ही गुंड आहोत हे सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. महाराष्ट्राच्या, हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत, असेही राऊत म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.