रत्नागिरीतील खेडमध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी जाहीर सभा झाली. या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपसहित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपच्या व्यासपीठावर साधू संत दिसायचे, आता संधी साधू दिसतात, असे विधान केले होते. त्याच विधानावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होताच चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक ट्वीट केले. त्या ट्वीटमध्ये लिहिले की, ‘भाजपाच्या व्यासपीठावर आधी साधू असायचे, आता संधीसाधू – उद्धव ठाकरे. पालघरची घटना इतक्यात विसरलात? उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना निष्पाप साधूंच्या हत्या झाल्या. मारेकऱ्यांना तुम्ही पोटाशी धरले. रक्ताचे पाट तुमच्याच कारकिर्दीत वाहिले. शिमग्याच्या बोंबा पुरे आता..’
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ‘धूळवड होऊ द्या, त्यानंतर शिवसेनेचा भगवा राज्यात आणि देशात फडकवा. उद्या शिमगा आहे, त्यानंतर धुळवड आहे. त्यानंतर रंगपंचमी आहे. त्यानंतर अशी हुकूमशाही सुरू होईल की, तुम्हाला डोकेही वर काढता येणार नाही. आता आपण देशासाठी उभे राहिलो नाही, तर २०२४ या देशातील शेवटच्या निवडणुका ठरतील. आपला देश पुन्हा गुलामगिरीत जाणार नाही, यासाठी प्रतिज्ञा करा. खंडोजी खोपडे होणार का कोन्होजी जेधे हे ठरवा. देशासाठी, महाराष्ट्रासाठी माझ्यासोबत येणार का चोरांसोबत जाणार? आता आपले हात रिकामे आहेत, घरादारावर धाडी पडू शकतात तरी माझ्यासोबत येणार का? जनता जो निर्णय करेल, तो आपल्याला मान्य असेल.’
‘क्रांतीकारकांनी रक्त शिंपडून तुमची गुलामगिरी करण्यासाठी स्वातंत्र्य मिळवलेले नाही. अनेक क्रांतीकारकांची नावेही आपल्याला माहिती नाही. गोमूत्र शिंपडून देश स्वतंत्र झालेला नाही, क्रांतीकारकांनी रक्ताचा अभिषेक करून हे स्वातंत्र मिळवले आहे. आपले सैनिक आणि जवान देशाचे रक्षण करतात. देशाचे स्वातंत्र्य आणि संविधान धोक्यात आले आहे. कपिल सिब्बल यांनी चांगली सुरुवात केली आहे. त्यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. दरम्यान आधी भाजपच्या व्यासपीठावर साधूसंत दिसायचे, आता त्यांच्या सभेत संधीसाधू दिसतात. विरोधी पक्षात असलेले पापी, भ्रष्टाचारी आणि त्यांच्याकडे गेल्यावर ते शुद्ध होतात,’ असे ठाकरे म्हणाले होते.
Join Our WhatsApp Community