राज्यातल्या महाविकास आघाडीच्या सरकारला आता दोन वर्षे पूर्ण व्हायला आली असून, अजूनही सरकार अस्थिर होताना भाजपला दिसत नाही. त्यातच आता पुन्हा एकदा सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु झाले असून, महाविकास आघाडीची ऑटो पंक्चर करायची असे विधान राज्याचे माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. आमची क्लिअर भूमिका आहे. आम्ही ठरवलेय, 51 टक्क्यांची लढाई लढायची आणि महाविकास आघाडीची ऑटो पंक्चर करायची, असे विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
भाजपची संकल्प यात्रा
चांदा ते बांदा दरम्यानच्या मतदान केंद्रावर 25 लाख युवांना संकल्प यात्रा काढून जोडण्याचे अभियान सुरू करण्यात आले आहे. 25 डिसेंबर हा अटलजींचा वाढदिवस आहे. त्या दिवशी आम्ही हा संकल्प पूर्ण करू, असे बावनकुळे यावेळी म्हणाले. महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी, मराठा आरक्षण गेले. आम्हाला या सरकारचा बदला घ्यायचा आहे. कोर्टाने 4 मार्चला सांगितले होते की, राज्य सरकारने डेटा तयार करावा. मात्र सरकारने डेटा तयार केला नाही. हा डेटा सेन्सस डेटा आहे. त्यावेळी मनमोहन सिंगांनी सांगितले होते यात चुका आहेत. अजित पवारांनी खोटी माहिती दिली. या सरकारला आरक्षण द्यायचे नाही. त्यांना अन्यायच करायचा आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापणे सुरू झाले आहे. हे सरकार मुघलांसारखे वागत आहे. युवकांचे प्रश्न आहेत, आरोग्य विभागाची परीक्षा जाहीर केली आणि 12 तास आधी रद्द केली, हा सर्वच सावळागोंधळ सुरू आहे, असेही त्यांनी सांगितलं. एवढेच नाही तर मुख्यमंत्री वांद्र्यापुरते आणि मंत्री गावापूरते राहिल्याची टीका देखील बावनकुळे यांनी केली आहे.