पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला बोलवा, धाब्यावर घेऊन जा, असा सल्ला कार्यकर्त्यांना देणाऱ्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केला आहे. ‘बातम्या देण्याचा अधिकार पत्रकारांचा आहेच, मात्र चुकीच्या बातम्या येऊ नये, याची काळजी घेण्यासाठी आपण पत्रकारांशी चांगले संबंध ठेवले पाहिजे’, या संदर्भाने मी बोललो होतो असे स्पष्टीकरण त्यांनी आता दिले आहे.
अहमदनगरमध्ये ‘महाविजय २०२४ विधानसभा पदाधिकारी संवाद बैठकी’त बावनकुळे यांनी हे विधान केले. ते म्हणाले, ज्या बुथवर तुम्ही काम कराल तेथे इलेक्ट्रॉनिक मीडियावाले कोण आहेत, पोर्टलवाले कोण आहेत हे पाहावे. आपण एवढे चांगले काम करतो, पण हे असे काही टाकतात की, जणू गावात बॉम्बच फुटलाय. त्यामुळे बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत. त्यांची यादी तयार करा.
पत्रकारांच्या यादीत एक, दोन पोर्टलवाले, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिकवाले असतील, त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा. चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, त्यात काही कमी जास्त झाले तर सुजय विखे आहेत. ते म्हणतील ढाब्यावर जायचे, त्यासाठीच तयार झाले आहेत ते. महाविजय २०२४ पर्यंत बुधच्या संदर्भात एकही बातमी विरोधात येणार नाही, याची काळजी घ्या. भाजपसंदर्भात सर्व सकारात्मक बातम्या आल्या पाहिजेत, याची काळजी घ्या, असे वादग्रस्त विधान बावनकुळे यांनी केले.
(हेही वाचा – Kolhapur Robbery : कोल्हापूरमधील पट्टणकोडी येथील तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या मूर्तीवरील दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लुटला)
बावनकुळेंचे स्पष्टीकरण
पत्रकारांविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर चौफेर टीका सहन करावी लागल्यामुळे बावनकुळे यांनी आता घुमजाव केला आहे. ‘भाजपाचे कार्यकर्ते बुथ स्तरावर चांगले काम करीत आहेत. त्यांच्या कामाची प्रसिद्धी व्हावी यासाठी प्रयत्न करायलाच हवा. अनेकदा असे होते की घटना घडलीच नाही; अपूर्ण माहितीवर बातमी येते. बातम्या देण्याचा अधिकार पत्रकारांचा आहेच, मात्र चुकीच्या बातम्या येऊ नये, याची काळजी घेण्यासाठी आपण पत्रकारांशी चांगले संबंध ठेवले पाहिजे या संदर्भाने मी बोललो होतो आणि त्यात गैर काही नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे, कोणत्याही गोष्टीचा निगेटिव अर्थ काढणे चुकीचेच, असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community