नरेंद्र मोदी मोठे नेते, बरोबरी होऊ शकत नाही! बावनकुळेंचा शरद पवारांना इशारा 

148

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. शरद पवार आणि नितीश कुमार यांच्या कितीही भेटी होऊ द्या. काही फरक पडत नाही. तिसरी, चौथी, पाचवी कुठलीही आघाडी केली तरी ती आघाडी त्यांना लखलाभ असो. मोदींकडे जग विश्वगुरू म्हणून बघते. अशा नेत्याची तुम्ही बरोबरी करू शकत नाहीत. ज्यांचे दहाच्यावर खासदार निवडून येत नाहीत, ज्यांचे साठच्यावर आमदार निवडून येत नाहीत. ते दिवसा स्वप्न बघायला लागले आहेत, अशी खोचक टीका करतानाच शरद पवारांनी नरेंद्र मोदींच्या नादी लागू नये, असा इशाराही चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

(हेही वाचा पंतप्रधान 8 सप्टेंबर रोजी ‘कर्तव्य पथ’ चे उद्‌घाटन करणार)

चंद्रशेखर बावनकुळे हे मीडियाशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. शरद पवार आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या भेटीवरही त्यांनी टीका केली. नितीश कुमार यांना मिळालेले मुख्यमंत्रीपद हे भारतीय जनता पार्टीची कृपा आहे. नितीश कुमार यांनी दगाबाजी केली. इकडे उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी केली. तिकडे त्यांनी केली. आम्ही दगाबाजांना त्यांची जागा दाखवून देणार, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील दोनशेच्यावर आमदार आम्ही निवडून आणणार. महाराष्ट्रात पुन्हा कधीच महाविकास आघाडीची सत्ता येणार नाही, असं सांगतानाच शरद पवार यांनी मोदीजींच्या नादी लागू नये. कारण ते प्रचंड मोठे नेते झाले आहेत, असं ते म्हणाले.

राज्यभर आमचाच महापौर असणार

येणाऱ्या महापालिका निवडणुका देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही लढू आणि प्रचंड ताकदीने जिंकू. मुंबईत आमचा महापौर असणार, पुण्यात आमचा महापौर असणार. महाराष्ट्रभर आमचेच महापौर असणार. कुठलीही निवडणूक येऊ द्या, नंबर एकचा पक्ष आमचाच असणार. महाविकास आघाडीला हरवत आमचे कार्यकर्ते सरपंचापासून महापौरांपर्यंत निवडून येतीलच, असा दावाही त्यांनी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.