राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न उपस्थित केला असल्याने त्या पक्षाच्या प्रदेश कार्यालयातील सरस्वती पूजन हे मनापासून झाले की, संपूर्ण राज्यातील हिंदू समाजाने टीका केल्यामुळे उशीरा सुचलेले शहाणपण आहे, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी उपस्थित केला.
( हेही वाचा : शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटासोबत कसे?)
मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी हिंदू देवदेवतांचा अपमान करण्याचे अनेक प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बाबतीत घडले आहेत. त्यामध्ये छगन भुजबळ सामील झाले आहेत. त्यांनी अनेकदा ओवैसीसारखी भूमिका स्वीकारली आहे. ज्या सरस्वती मातेचे पूजन करून आपण सर्वांनी शिक्षणाचे धडे घेतले तिच्या अस्तित्वाबद्दल छगन भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित केले. राज्यभरातील हिंदू समाजाने छगन भुजबळ व राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. त्यानंतर त्या पक्षाला सरस्वती पूजनाचे शहाणपण सुचले आहे. जनतेचा दबाव वाढला म्हणून ही पूजा केली की, मनात सरस्वतीला स्थान आहे, म्हणून राष्ट्रवादीने पूजा केली हे पहावे लागेल, असेही बावनकुळे म्हणाले.
शिंदे-फडणवीसांचे अभिनंदन
राज्यातील सात कोटी रेशनकार्डधारकांना दिवाळीसाठी प्रत्येकी शंभर रुपयात रवा, डाळ, साखर व तेलाचे पॅकेज देण्याचा भाजपा-शिवसेना सरकारचा निर्णय महत्त्वाचा आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. सरकार हा निर्णय चांगल्या रितीने अंमलात आणेल. तसेच तो लाभार्थींपर्यंत पोहचविण्यासाठी पक्ष संघटना काम करेल, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community