पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून ‘यांच्या’ नावावर शिक्कामोर्तब! काँग्रेस आमदारांच्या बैठकीत सर्वानुमते निवड

पंजाबचे काँग्रेस प्रभारी हरीश रावत यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.

137

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी शनिवारी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाब राज्याचा नवा गडी कोण, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी पंजाबमधील काँग्रेस आमदारांची एक बैठक पार पडली. या बैठकीत पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. पंजाबचे काँग्रेस प्रभारी हरीश रावत यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.

हरीश रावत यांचे ट्वीट

पंजाबमधील काँग्रेस आमदारांच्या बैठकीत चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावाची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे सांगताना आपल्याला अतिशय आनंद होत आहे, असे ट्वीट पंजाबचे काँग्रेस प्रभारी हरीश रावत यांनी केले आहे.

(हेही वाचाः कॅप्टन अमरिंदर सिंहांची ‘लढाई’ तून माघार!)

काय आहे रंधावा यांची प्रतिक्रिया?

चन्नी यांची निवड होण्यापूर्वी सुखजिंदर सिंह रंधावा यांचे नाव पंजाबचे भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चेत होते. परंतु रंधावा यांच्या नावाशी पक्षातील काही नेते सहमत नसल्याचे समजत आहे. त्यामुळे चन्नी यांची वर्णी लागल्याचे बोलले जात आहे. चरणजीत सिंह चन्नी यांची सर्वानुमते निवड झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणा-या सुखजिंदर सिंह रंधावा यांनी मात्र पक्ष नेतृत्त्वाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. चन्नी आपल्या भावासारखे असून त्यांच्या नावाची घोषणा झाल्याचा आपल्याला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया रंधावा यांनी दिली आहे. तसेच आपल्याला समर्थन देणा-या सर्व आमदारांचे आपण आभारी आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.

कोण आहेत चन्नी?

चरणजित सिंह चन्नी हे रामदासिया ह्या शीख कम्युनिटीतून येतात. अमरिंदर सिंह यांच्या मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री होते. औद्योगिक आणि तंत्रशिक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. ते चमकूर साहीब मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार झालेले आहेत. 2015 ते 16 वर्षभरासाठी चरणजित सिंह चन्नी यांनी पंजाबचे विरोधी पक्षनेते म्हणूनही काम केलेले आहे. चरणजित सिंह चन्नी हे दलित समुदायातून असून, कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे कडवे विरोधक मानले जातात.

काय घडले पंजाबमध्ये? 

पंजाबमध्ये एकीकडे विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी होत असताना, काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पंजाब काँग्रेस दोन गटात विभागली आहे. एक गट नवज्योत सिद्धू यांचा तर दुसरा कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा आहे. अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवण्याची मागणी केली जात होती. त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक आमदारांनी आवाज उठवला होता. हे प्रकरण इतकं वाढलं की काँग्रेसच्या केंद्रीय समितीला त्यात हस्तक्षेप करावा लागला होता. परंतु अखेर कंटाळून कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.