छत्रपती शिवाजी महाराज नसते तर भारताचे काय झाले असते, पाकिस्तानला जायची गरज नाही, पाकिस्तानची सीमा तुमच्या आमच्या घरासमोर असली असती, हे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे वाक्य आहे. जर मी असे काही म्हणालो तर खूप प्रतिक्रिया येतील म्हणून यशवंतराव चव्हाण यांचे वाक्य सांगितले, असेही अमित शहा म्हणाले. त्याकाळी शिवरायांनी शिवकालीन मंदिर मुघल साम्राज्यापासून वाचवली आणि नव्याने उभी केली, तेच कार्य आमचे सरकार राम मंदिर उभारून करत आहे, असेही शहा म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज हे रणांगणात नेहमीच समोरून शत्रूचा सामना करायचे. आग्राहून सुटका हा त्यांचा गनिमी काव्याचा डाव चकित करून सोडतो. एखाद्या सिनेमा सारखे त्याचे आयुष्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळीच ग्रामीण अर्थ व्यवस्था उभी केली होती. स्वत:चे तटरक्षक दल उभे केले. सुरत लुटताना त्यांच्या मनाला नक्कीच वेदना झाल्या असतील. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे फक्त एका राजाचे शिवचरित्र नाही तर तो एक विचार आहे, छत्रपती शिवरायांचा संघर्ष हा स्वराज्यासाठी होता. सत्ता लालसेसाठी त्यांचा संघर्ष नव्हता, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले.
शिवसृष्टीची उभारणी ईश्वरीय काम
शिवजयंतीच्या निमित्ताने पुण्यातील आंबेगाव इथे अमित शहा यांच्या हस्ते शिवसृष्टीचे लोकार्पण करण्यात आले. शिवजयंतीच्या पवित्र दिवशी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे अधुरे स्वप्न पूर्णत्वास जाते याचा विशेष आनंद आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपतींचा वैभवशाली इतिहास सामान्य लोकांपर्यंत पोहोचला. त्यावेळी मी गुजरातमध्ये मंत्री असताना पुरंदरे यांच्या जाणता राजा महानाट्याचे 8 प्रयोग लावले होते. शिवसृष्टीची उभारणी ईश्वरीय काम आहे. तुम्ही आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. शिवरायाचे जीवनचरित्र हे संपूर्ण देशाला प्रेरणा देते आहे आणि हा इतिहास देशभरात पोचवण्यात पुरंदरे यांचे मोठे योगदान आहे. शिवरायांचा संघर्ष हा स्वराज्यासाठी होता. सत्ता लालसेसाठी त्यांचा संघर्ष नव्हता, त्यांचे आयुष्य हे स्वराज्य स्थापन करण्यासाठी होते. संघर्षाचे होते, असे अमित शहा म्हणाले. ‘शिवसृष्टीच्या या प्रोजेक्टमध्ये एकूण 4 टप्पे असतील त्यासाठी 438 कोटी खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 60 कोटींच्या पहिल्या टप्प्याचे आज लोकार्पण झाले. बरेच लोक शिवचरित्र वाचत नाहीत अशा लोकांसाठी ही शिवसृष्टी नक्कीच प्रेरणा देत राहिल. ही आंबेगावची शिवसृष्टी ही फक्त देशातलीच नाहीतर आशिया खंडातले सर्वोकृष्ट थीम पार्क बनेल यात माझ्या मनात अजिबात शंका नाही. यात वैभवशाली इतिहासासोबतच अत्याधुनिक थ्रीडी तंत्राचाही वापर केला गेला आहे, अशी माहितीही शहांनी दिली.
(हेही वाचा न्यायालयात दाखल करणाऱ्या याचिकेत २ हजार कोटींचा मुद्दा टाकणार का; किरीट सोमय्यांचा सवाल)
Join Our WhatsApp Community