सचिन पाटील नावाने करायचा फसवणूक! पोलिसांनी मांडली गोसावीची मोडस ऑपरेंडी

109
विदेशात नोकरी देतो असे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी किरण गोसावी याला पुणे पोलिसांनी गुरुवारी अटक केली, त्यानंतर त्याच्या तासाभराच्या चौकशीतून पोलिसांना त्याची मोडस ऑपरेंडी समोर आली, गोसावी हा सचिन पाटील या नावाने देशभरात फिरायचा आणि लोकांची फसवणूक करायचा, अशी माहिती पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केपी गोसावी सचिन पाटील या नावाने सर्वत्र लपायचा. हॉटेलमध्ये राहत होता. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील हॉटेलातही तो याच नावाने राहायचा. त्याचा आम्ही तपास करत आहोत. तसेच तो एनजीओचा सदस्य असल्याची बतावणी करायचा. स्टॉप क्राईम ऑर्गनायजेशन आणि सिप्का कंपनीचा सदस्य असल्याचेही तो लोकांना सांगत होता. एक्सपोर्ट इम्पोर्टचा त्याचा व्यवसाय आहे. तसेच जॉब प्लेसमेंटचही तो काम करतो. त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.

 

गोसावीच्या शब्दांवर विश्वास का ठेवायचा? 

गोसावीने तो पोलिसांना शरण येणार असल्याचे आम्हाला सांगितले नाही. त्याबाबत त्याने आमच्याशी संपर्कही साधला नाही. त्याने माध्यमाला काय दावा केला मला माहीत नाही, माध्यमांशी तो काय बोलला त्यावर आम्ही विश्वास का ठेवायचा?, असे सांगत गोसावीच्या अटकेमध्ये कोणतेही राजकारण नसल्याचे आयुक्त गुप्ता म्हणाले. गेल्या दहा दिवसांपासून तो कुठे कुठे लपला होता याची आम्ही माहिती घेतली. तो हैदराबाद आणि लखनऊमध्ये असल्याचे कळले होते. त्यानुसार आम्ही कारवाई केली, असेही त्यांनी सांगितले.

चिन्मयची बरीच मदत

या प्रकरणात आम्हाला चिन्मय देशमुख यांनी बरीच मदत केली. चिन्मयने आम्हाला जी माहिती दिली ती आरोपपत्रात दाखल करणार आहोत. आरोपपत्रात ज्या ज्या गोष्टी राहून गेल्या आहेत, त्या सर्व नमूद केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. आम्ही गोसावीच्या फसवणुकीच्या प्रकरणावर लक्ष केंद्रीत केले आहे. आर्यन खान प्रकरणावर फोकस नाही. एनसीबीने आमच्याशी कोणताही संपर्क साधला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.