घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता होताच भुजबळांची ‘शेरो शायरी’

महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून, न्यायालयाच्या या निर्णयानंतर छगन भुजबळ चांगलेच खूश दिसले. विशेष म्हणजे न्यायालयाच्या निकालानंतर छगन भुजबळ पत्रकार परिषदेत शेरो शायरी करताना देखील पहायला मिळाले.

 

साज़िशें लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने के लिए,

ये तो आपकी, जनता की दुआएं है की उन्हें मुकम्मल नहीं होने देती,

अशी शायरी म्हणत भुजबळांनी विरोधकांना टोला हाणला. आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे निराधार आहेत, त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे, असे भुजबळ यांनी म्हटले होते. त्यानंतर गुरुवारी न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर भुजबळांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी दोघांतर्फे भुजबळांचे अभिनंदन करण्यात आले.

(हेही वाचाः महाराष्ट्र सदन घोटाळा : छगन भुजबळ निर्दोष, दमानिया उच्च न्यायालयात जाणार!)

काय म्हणाले भुजबळ?

महाराष्ट्र सदन प्रकरण हे जगभर गाजलं. पंचतारांकित हॉटेलसारख्या बांधलेल्या या सदनाचा अनेक राजकीय पक्ष वापर करत आहेत. महाराष्ट्र सदनाच्या कंत्राटदाराला हे बांधकाम झाल्यानंतर १०० कोटी रुपयांचा एफएसआय देऊ, असे मंत्रिमंडळाकडून सांगण्यात आले होते. आजपर्यंत त्या कंत्राटदाराला एक फूट जमीनही मिळालेली नाही. तरीसुद्धा आरोप करुन महाराष्ट्र सदनामध्ये ८०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला. मीडिया ट्रायल सुद्धा झाली. त्यामुळे सव्वा दोन वर्षांपेक्षा जास्त काळ आम्हाला तुरुंगामध्ये रहावं लागलं, असे देखील भुजबळ म्हणाले.

(हेही वाचाः लॉकडाऊनमध्ये बियर-बार सुरू ठेवण्यासाठी असे होते वाझेचे ‘रेटकार्ड’)

द्वेषबुद्धी नाही

आमचा काही दोष नसल्याने आम्हाला या प्रकरणातून वगळण्यात यावे यासाठी वकिलांतर्फे याचिका करण्यात आली होती. त्यानंतर आता आम्हाला या प्रकरणातून निर्दोष म्हणून वगळण्यात आले आहे. अतिशय विनम्रपणे संयम ठेऊन आम्ही या यशाचा स्वीकार केला आहे. कुणाही बद्दल आमच्या मनामध्ये द्वेषबुद्धी नाही, कुणाच्याही बद्दल तक्रार नाही. काही वेळेला नियतीच्या मनामध्ये जे असतं त्याप्रमाणे घडतं.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here