तोपर्यंत मविआ सरकार पडणार नाही! काय म्हणाले भुजबळ?

220

राज्यातले महाविकास आघाडी सरकार हे पुरोगामी सरकार आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने पुढे जाणारे हे सरकार आहे. जोपर्यंत या सरकारच्या पाठीमागे शरद पवार नावाची शक्ती उभी आहे, तोपर्यंत राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला काहीही होणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. कोल्हापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

मविआ सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न

या देशात केंद्र सरकार, राज्य सरकार आणि तिसरे ईडी, सीबीआय यांचे सरकार आहे. या संस्थांचा गैरवापर केला जात आहे. महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत. मात्र राज्य सरकार विकास कामांवर लक्ष देण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणूनच राज्याच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने सर्वांसाठीच भरीव तरतूद केली आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी शासनाने भरीव तरतूद प्रस्तावित केली आहे.

(हेही वाचाः हा महाविकास आघाडीचा अहंकार, भाजपाची खरमरीत टीका!)

शाहू महाराज स्मारकासाठी निधी

राज्यातले महाविकास आघाडी सरकार हे सर्व घटकांना पुढे घेऊन जाणारे आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात राज्याने सर्व घटकांना समान न्याय दिला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ६ मे रोजी १००वी पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने हे वर्ष “कृतज्ञता पर्व” म्हणून आपण साजरे करणार आहोत. त्यासाठी राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकासाठी देखील आवश्यक निधी आपले महाविकास आघाडी सरकार उपलब्ध करून देणार आहे.

(हेही वाचाः तर योग्य तो धडा शिकवला जाईल, हे याद राखा!)

कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी २५ कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाला “यशवंतराव चव्हाण ग्रामविकास प्रशाला” “राजर्षी शाहू महाराज संशोधन केंद्र व संग्रहालय संकुल” तसेच अन्य विभागांच्या आधुनिकीकरणासाठी १० कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. कोल्हापूर विमानतळासाठी आवश्यक जमिनीचे भूसंपादन व निर्वनीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत, अशी माहिती देखील भुजबळ यांनी उपस्थितांना दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.