दिवाबत्तीवरून ‘ठाकरे’ आमनेसामने! 

माणूस मोठा झाला की कोत्या मानसिकतेचा होतो का, असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी समाजमाध्यमातून केला आहे.

178

दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान(शिवाजी पार्क) परिसरात मागील अनेक वर्षांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून विद्युत रोषणाई केली जाते. पण मनसेच्यावतीने आजवर स्वखर्चातून होणारी ही विद्युत रोषणाई आता सरकारी आणि करदात्यांच्या पैशातून होणार आहे. मनसे जिथे स्वत:च्या खिशातून याकरता पैसे खर्च करत होती, तिथे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आमदार निधीतून हा परिसर उजळण्यासाठी पैसे खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माणूस मोठा झाला की कोत्या मानसिकतेचा होतो का, असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी समाजमाध्यमातून केला आहे. मात्र, याठिकाणी कायमचीच विद्युत रोषणाई केली जाणार असल्याने हा परिसर तेजोमय होणार आहे.

१ कोटी २५ लाख आमदार निधीतून

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी फेसबूकवर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी आमदार स्थानिक विकास निधीअंतर्गत सन २०२०-२१ मधून प्रशासकीय मंजुरीचे पत्र प्रदर्शित केले आहे. ज्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दादर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक फेरफटका मारण्यासाठी तसेच अनेक खेळाडू व इतर नागरिक धावण्यासाठी मैदानाच्या भोवतालच्या पाऊलवाटेचा तथा मार्गाचा वापर करत असतात. पण या ठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना असुविधा होते. त्यामुळे या पाऊलवाटेवर अतिरिक्त विद्युत दिवे व इतर सुशोभीकरण करण्यासाठी आमदार निधीमधून १ कोटी २५ लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्याची सूचना केली आहे.

(हेही वाचाः महापालिकेच्या शिक्षण विभागाची खादी गणवेशावर ‘फुल्ली’!)

जनतेच्या पैशातून का?

मुख्यमंत्र्यांच्या या पत्रावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी, दरवर्षी लोकांना निखळ आनंद मिळावा म्हणून राजसाहेब संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज पार्कला स्वखर्चातून विद्युत रोषणाई करत असतात. पण ते श्रेय मनसेला मिळू नये म्हणून जनतेच्या पैशातून वर्षभर रोषणाई करण्याचा घाट घातला जात आहे. माणूस मोठा झाला की कोत्या मानसिकेततेचा होतो का असा सवाल करत, जर खरोखरच करायचे आहे तर तर मग जनतेच्या पैशातून का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. हा खर्च महिन्याला येणाऱ्या कलेक्शनधून करा, असे सांगत देशपांडे यांनी या विद्युत रोषणाईबाबत शुभेच्छाही दिल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.