आसाममध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन उभारणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

191

महाराष्ट्र आणि आसाम या दोन राज्यांच्या संस्कृतीत अनेक साम्यस्थळे असून ही दोन राज्य सांस्कृतिकदृष्ट्या एकमेकांच्या जवळ यावी यासाठी आसाममध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार आहे. आसाममध्ये सेवा बजावणा-या मराठी भाषीक राजपत्रित अधिका-यांनी गुवाहाटी येथील रेडिसन ब्लू हाॅटेलमध्ये झालेल्या बैठकीत शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली होती. याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही मागणी मान्य केली आहे.

आसाममधील प्रसिद्ध कामाख्या देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक महाराष्ट्रातून येतात. त्यांना सोयी सुविधा पुरवणे, महाराष्ट्रातून आलेल्या लोकांना लागेल ती मदत उपलब्ध करुन देणे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मंडळाकडून शक्य ते सारे प्रयत्न केले जातात. या मंडळातील राजपत्रित अधिका-यांनी काही वर्षे आसाम राज्यात सेवा बजावल्यानंतर या दोन्ही राज्यांमध्ये सांस्कृतिकदृष्ट्या अनेक साम्यस्थळे असल्याचे जाणवल्याने या दोन्ही राज्यांना सांस्कृतिकदृषट्या जवळ आणण्याची गरज जाणवू लागल्याचे सांगितले आहे.

…म्हणून भवन उभारण्याची मागणी 

राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिंदे गटाचे सर्व आमदार पुन्हा एकदा गुवाहाटीमध्ये काही दिवस राहण्यासाठी आले होते. त्यामुळे आसाममधील गुवाहाटीचे नाव पुन्हा प्रकाशझोतात आले. नवस फेडण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा आपले मंत्री आमदार, खासदार यांना घेऊन गुवाहाटीला आले. त्यामुळे हेच औचित्य साधून या मंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये आसामध्ये कामाख्या देवीच्या दर्शनासाठी येणा-या लोकांची सोय व्हावी यासाठी महाराष्ट्र भवन बांधावे आणि दोन राज्य सांस्कृतिकदृष्ट्या जवळ यावी यासाठी सांस्कृतिक भवन बांधावे अशी मागणी करण्यात आली.

शिंदे यांनी या मागणीसाठी सकारात्मकता दाखवताना ही दोन राज्ये एकमेकांच्या अधिक जवळ यावीत तसेच सांस्कृतिकदृष्टीने जोडली जावीत यासाठी नक्की काय करता येईल ते नक्की करु अशी ग्वाही दिली. तसेच, या मंडळाने केलेल्या मागणीनुसार, आसासमध्ये महाराष्ट्र भवन सांस्कृतिक भवन आणि विठ्ठल रखुमाईचे मंदिरही उभारण्यासाठी त्यांनी सकारात्मकता दर्शवली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.