सुहास शेलार
अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ४० आमदारांनी युती सरकारला पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. शिवसेना-भाजपामधले इच्छुक बघ्याच्या भूमिकेत आणि राष्ट्रवादीचे ९ आमदार कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेताना दिसले. राज्यातील या नाट्यमय शपथविधी सोहळ्यानंतर आता केंद्रातही मंत्रिमंडळ विस्तार होऊ घातला असून, त्यात छत्रपती उदयनराजे भोसले यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
उदयनराजे भोसले यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना तलवार भेट दिली. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलही उपस्थित होते. या भेटीदरम्यान राजेंना केंद्रातील संभाव्य मंत्रिपदाविषयी माहिती देण्यात आली. उदयनराजेंना मंत्रिपद देण्यामागे पश्चिम महाराष्ट्रातील गणिते अवलंबून आहेतच, पण कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपतींना योग्य संदेश देण्याचा हेतूही यामागे आहे.
(हेही वाचा – Raj Thackeray : भुजबळ आणि पटेल अजित पवारांसोबत जाणाऱ्यातले नाहीत; राज ठाकरेंनी व्यक्त केला संशय)
संभाजीराजे छत्रपती यांनी ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना करीत आगामी निवडणुका लढण्याची घोषणा केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे, नाशिक आणि काही प्रमाणात मराठवाड्यात त्यांचा प्रभाव आहे. त्याचा सर्वाधिक फटका भाजपाला आणि राष्ट्रवादीला बसणार आहे. या पट्ट्यातले राष्ट्रवादीचे अनेक आमदार सध्या भाजपाच्या तंबूत विसावले आहेत. त्यामुळे उदयनराजेंच्या आडून संभाजीराजे छत्रपतींचा प्रभाव कमी करण्याची रणनीती भाजपाकडून आखली जात आहे.
शिवरायांच्या वारसांचा सन्मान
छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांचे नाव घेतल्याशिवाय एकही राजकीय पक्ष मतदारांना सामोरा जात नाही. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाने छत्रपती उदयनराजे भोसले यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्याचे निश्चित केले आहे. छत्रपती शिवरायांच्या वारसाचा योग्य सन्मान राखल्याचा संदेश जनतेत पोहोचवण्याचा हेतू यामागे आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community