नाट्य-चित्रपट क्षेत्राच्या गतवैभवासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही

123

‘आपली संस्कृती, कला जोपासलीच पाहिजे. ती आपली जबाबदारी आहे. त्यामुळे मराठी नाट्य, चित्रपट आणि कला क्षेत्राला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,’अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी ”मला तुमचं ऐकायचंय…! आपण एकमेकांबद्दल बोलत असतो. आता एकमेकांशी बोलुया.., असं म्हणत एका विशेष भेटीत दिलखुलास संवाद साधला. यावेळी मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील निर्माते, दिग्दर्शक, कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चित्रनगरीला भेट देऊन पाहणी करण्यात येईल

गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये चांगले रस्ते, पायाभूत सुविधा, प्रवासी वाहतूक व्यवस्था, सुरक्षा आणि स्वच्छतेची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. चित्रपटांना जीएसटी मधून सूट, ज्येष्ठ कलाकारांसाठी मानधन योजना, त्यांना विनामूल्य वैद्यकीय सुविधा, ज्येष्ठ कलाकार, वादक, तंत्रज्ज्ञ आदींना विमा संरक्षण याबाबत तसेच अनेक धोरणात्मक बाबींविषयी मंत्रालयात बैठक आयोजित करून संबंधित विभागांच्या समन्वयाने चर्चेतून मार्ग काढला जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वस्त केले. तसेच चित्रनगरीला भेट देऊन पाहणी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

( हेही वाचा : ‘आरे’मध्ये आढळली लम्पीबाधित जनावरे, १० किमीपर्यंत बाधित क्षेत्र घोषित)

मुख्यमंत्री म्हणाले, कला क्षेत्राकडे पाहताना आपल्याला कायम त्यामागील झगमगाट दिसतो. मात्र कलाकारांच्या व्यथा त्यांचे प्रश्न समजत नाहीत. ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे या दोघांनाही कला, संस्कृती आणि मराठी कला क्षेत्राविषयी जिव्हाळा होता. या क्षेत्रातील पडद्यामागील कलावंत, तंत्रज्ज्ञ यांच्याची निगडीत असे अनेक विषय आहेत. त्यांना परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत यापासून विमा संरक्षण अशा सर्वच बाबतीत सकारात्मक निर्णय घेतले जातील. नाट्यगृहांची परिस्थिती सुधारणे, एकपडदा चित्रपटगृहांच्या समस्या तसेच चित्रपटांसाठी कर सवलत तसेच अन्य मुद्यांवरही विचारविनिमय, चर्चेने उपाययोजना केल्या जातील. संस्कृती, कला जोपासली गेली पाहिजेत. या गोष्टी संवर्धन व्हावे यासाठी प्रयत्न केले जातील. समाजासाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत. यातूनच उत्तम कलावंत घडतील, ते देश आणि आपल्या राज्याचा नावलौकीक वाढवतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आपल्या नाट्य, चित्रपट सृष्टीला गतवैभव पुन्हा मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.