मुख्यमंत्री साहेब, संजय राऊतांना आवरा, अन्यथा…! काँग्रेस नेत्यांचा इशारा! 

युपीएच्या अध्यक्षपदी एनसीपीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाच बसवा, असे शिवसेना नेते संजय राऊत वारंवार वक्तव्य करत आहेत, त्यामुळे काँग्रेस नेत्यांना आता संताप अनावर झाला आहे.  

राज्यात एका बाजूला कोरोनाने हाहाकार माजवला आहे, तर दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत दररोज सकाळी पत्रकारांशी बोलताना काँग्रेसच्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नेतृत्वावर आगपाखड करत आहेत. यावर राज्यातील काँग्रेस नेतृत्वाने  वारंवार ठणकावूनही राऊत काही ऐकेनात, म्हणून अखेर कंटाळून शनिवार, ३ मार्च रोजी काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि संजय राऊत यांना एकदाचे आवरा, अन्यथा सरकारसाठी हे चांगले होणार नाही, असा गर्भीत इशारा दिला, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने एच.के. पाटील, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. मात्र ही भेट थोडक्यात आटोपून काँग्रेसचे नेतेमंडळी लगेचच बंगल्याच्या बाहेर पडले.

(हेही वाचा : शरद पवार रुग्णालयातून घरी परतले! राज्याचा गाडा रुळावर येणार का? )

काही मिनिटात आटोपली बैठक!

सध्या शिवसेना नेते संजय राऊत हे एक कलमी कार्यक्रम राबल्याप्रमाणे दररोज देशातील युपीएच्या नेतृत्वात बदल झाला पाहिजे, युपीएच्या प्रमुखपदी कुणीतरी बिगर काँग्रेसी आणि गांधी घराण्याच्या व्यतिरिक्त असावा, असे वक्तव्य करत आहेत. यासाठी राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नाव सुचवत असतात. हे थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा असतो. म्हणून राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.

काय झालेले आरोप-प्रत्यारोप? 

  • संजय राऊत यांच्याकडून वारंवार युपीएच्या नेतृत्वावर भाष्य केले जात असल्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का, त्यांनी सलग दोन वेळा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेसमुळे आहे, हे ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत दम दिला.
  • त्यावरही संजय राऊत यांनी, काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी दिल्लीच्या राजकारणाचा अभ्यास नाही. त्यांनी त्यावर बोलू नये. त्यांनी राज्यातील विषयावर बोलावे. दिल्लीत काय चर्चा सुरु आहे, हे त्यांना माहित नाही. दिल्लीत आताच तिसरी आघाडी निर्माण करण्याची तयारी सुरू झाली आहे. युपीए २ची तयारी सुरु आहे, त्याने नुकसान होणार आहे. त्यापेक्षा युपीए १ लाच अधिक मजबूत करण्याची गरज आहे, असे वक्तव्य केले.
  • तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी, शिवसेना युपीएच्या घटक नाही, त्यामुळे संजय राऊत यांनी युपीएच्या नेतृत्वावर भाष्य करू नये, असे ठणकावले.
  • काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही अशा प्रकारे काँग्रेसवरील टीका सहन केली जाणार नाही, असे म्हटले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here