मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवार, १३ सप्टेंबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात जाऊन भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संध्याकाळी पाच वाजता आंतरवाली सराटी गावात पोहोचतील. दुपारी चार वाजता औरंगाबादच्या विमानतळावर पोहोचून अंतरवाली सराटी गावात जातील. त्यानंतर तिथे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडण्याची विनंती करतील. त्यामुळे गेल्या सोळा दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांचे उपोषण आज सुटणार का? असा प्रश्न आहे.
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी इथे येऊन उपोषण सोडवावे, अशी अट मनोज जरांगे पाटील यांनी ठेवली होती. ही अट देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. एकनाथ शिंदे हे अजित पवारांसह दुपारी मुंबईहून जालन्यासाठी रवाना होणार आहेत. मनोज जरांगे यांच्या या आंदोलनामुळे महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघाले आहे. लाठीमाराच्या घटनेनंतर राज्यभर ठिकाणी आंदोलन, रास्तारोको करण्यात आले होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपोषणस्थळी जाणार आहेत. त्यामुळे त्यांची आजचीही भेट अतिशय महत्त्वाची असणार आहे. यातून मराठा समाज समाधानी होईल का हे पाहावे लागेल.
(हेही वाचा Russia Praises India : रशियाने भारताकडून शिकण्यासारखे आहे, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडून कौतुक )