बीडीडी चाळीतील पोलिसांच्या घरांसाठी १५ लाख रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ५० लाख आणि २५ लाख असा दर ठरवण्यात आला होता परंतु आता बीडीडी चाळीतील पोलिसांच्या घरांसाठी १५ लाख दर निश्चित करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी विधानसभेत दिली.
बीडीडी चाळीत पोलिसांना १५ लाखांत घर
बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांना ५० लाख रुपयांत घर घेणे परवडणारे नाही. आम्ही बीडीडीतील पोलिसांना २५ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत घर देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली होती. यानंतर गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांच्या घरांसाठी १५ लाख दर निश्चित केल्याचे सांगितले. नायगाव बीडीडीमध्ये १८, वरळी येथे १९, ना.म.जोशी मार्ग येथे ८, तर शिवडीत ५ अशा ५० शासकीय इमारती असून यामध्ये इतर कर्मचाऱ्यांसह सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी अनेक वर्षांपासून वास्तव्याला आहेत.
गिरणी कामगारांसाठी ५० हजार सदनिका लवकरच
गिरणी कामगारांना ५० हजार सदनिका देण्यासाठी उपलब्ध होत आहेत. ती त्यांना देण्यात येतील. म्हाडा पुनर्विकासातील रहिवाशांना सध्या जे भाडे कमी दिले जाते आहे, ते २५ हजार रुपये देण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Join Our WhatsApp Community