मीरा भाईंदरला ‘मॉडेल शहर’ बनविणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

169

मुंबई व ठाण्यालगतचे शहर असलेल्या मीरा भाईंदरला सर्व सोयीसुविधा युक्त मॉडेल शहर बनविण्याची घोषणा मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. राज्य शासन यासाठी सर्वतोपरी मदत करणार असून, येथील नागरिक आणि लोकप्रतिनिधींनीही प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

( हेही वाचा : अलर्ट! पुण्यातील पाणीपुरवठा १३ ऑक्टोबरला राहणार बंद)

मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मिरा रोड (पूर्व ) महाजनवाडी येथे स्केटींग रिंगचे लोकार्पण, महापालिकेच्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे भूमीपुजन, भाईंदर (प.) येथील चिमाजी अप्पा यांच्या पुतळ्याचे लोकार्पण, घोडबंदर येथील महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय भवनाचे भूमिपुजन, भाईंदर (पूर्व) येथील महाराणा प्रताप पुतळ्याचे व मिरारोड (पूर्व) येथील भारतरत्न गान सम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात ते बोलत होते. शिंदे म्हणाले की, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने मीरा भाईंदर शहरात अत्याधुनिक नाट्यगृह उभारले आहे. राज्यासाठी आणि देशासाठी लता दीदींचे अमूल्य योगदान आहे. लता दिदींच्या नावामुळे नाट्यगृहाची उंची वाढली आहे. त्याचप्रमाणे शहरात उभारलेल्या महाराणा प्रताप व शूरवीर चिमाजी अप्पा यांच्या पुतळ्यांमुळे पुढील पिढीला त्यांचा पराक्रम कळेल व प्रेरणा मिळून देशाभिमान जागृत होईल. मूलभूत सुविधा बरोबरच अश्या प्रकारच्या विरंगुळ्याच्या वास्तू उभारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनाची व प्रतिनिधींची इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे. मीरा-भाईंदर परिसरातील लहान मुलांच्या कलागुणांना विकसित करण्यासाठी मीरा-भाईंदर महापालिकेने केलेली कामे कौतुकास्पद आहेत.

आमचे सरकार लोकाभिमुख

बांधकाम टीडीआरमुळे चांगल्या वास्तू उभ्या राहत आहेत. मोठ मोठी प्रकल्पे बांधण्यासाठी महापालिकेकडे निधी उपलब्ध असेलच असे नाही. अशा मोठ्या प्रकल्पांची बांधकामे महापालिकेचा पैसा न वापरता बांधकाम टीडीआरमधून बांधल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल. हे शासन लोकाभिमुख शासन असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ मिळावा या दृष्टीने शासन सदैव प्रयत्नशील आहे. या शासनाने गेल्या शंभर दिवसात सामान्य माणसाच्या विकासासाठी व सामान्य माणसाच्या हिताचे सर्व महत्त्वाचे निर्णय घेतले. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी विकास कामे मार्गी लावणार आहोत. जनतेच्या विकासासाठी आवश्यक ते निर्णय घेण्यात येत आहेत. आपण लोकांशी बांधील आहोत लोकांना न्याय दिला पाहिजे. केंद्राच्या सहकार्यामुळे राज्यातील मोठमोठे प्रकल्प मार्गी लागत आहेत. जे प्रकल्प केंद्राला पाठवले जातात ते ताबडतोब त्वरित मंजूर करून मिळत आहेत. नगरविकास विभागासाठी सोळा हजार कोटींचच्या निधीस केंद्राने मंजुरी दिली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.