CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभागृहात तुफान फटकेबाजी; मराठा आरक्षण, कोरोनावरून विरोधकांवर हल्लाबोल

309

हिवाळी अधिवेशनातील विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बुधवार, २० डिसेंबर रोजी उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी तुफान फटकेबाजी केली. मविआचे सरकार असताना मराठा आरक्षणावरील उपसमितीच्या अध्यक्षपदी आपली वर्णी लागू नये यासाठी कसे राजकारण करण्यात आले आणि कोरोना काळात कसा भ्रष्टाचार झाला, याविषयावर विरोधकांची बोलती बंद करताना त्यांनी तुफान फटकेबाजी केली.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्षपद आपल्याला मिळू नये यासाठी राजकारण झाले. तेव्हा आपण उपसमितीचा अध्यक्ष होऊ नये म्हणूनही पडद्याआडून बरेच प्रयत्न झाले. मी मराठा समाजासाठी प्रामाणिकपणे काम करेनअशी भीती त्यावेळी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्र्यांना आणि अशोक चव्हाणांना होती. मी तेव्हाही म्हटले अशोक चव्हाण अध्यक्ष होत आहेत, तर होऊ द्या. जे काही साटेलोटे केले, डावलले हा विषय झाला गेला गंगेला मिळाला, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गौप्यस्फोट केला.

विरोधक ‘दिशा’हीन

अधिवेशनात विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाविषयी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव वाचला. त्यात प्रकर्षाने काही गोष्टी जाणवल्या. विरोधी पक्ष अतिशय गोंधळलेल्या अवस्थेत आहे. कदाचित महाविकास आघाडीचे सगळे वरीष्ठ नेते दिल्लीत जागा वाटपाच्या कामात व्यग्र असल्यामुळे त्यांना योग्य दिशा मिळाली नसेल. शिवाय दिशा सालियान प्रकरणात काही सदस्यांनी मते मांडल्यामुळे आधीच दिशाहीन झालेल्या विरोधी पक्षाचे गलबत आणखीनच भरकटलेले दिसले, असे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.

(हेही वाचा Veer Savarkar Mukti Shatabdi : सन्मान सावरकरांचा, जागर हिंदुत्वाचा; स्वातंत्र्यवीर सावरकर मुक्ती शताब्दीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन)

उद्धव ठाकरे शेवटून पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री

कोविड काळात महापालिकेत झालेला भ्रष्टाचार म्हणजे मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा या अरेबियन नाईट्सच्या कथांपेक्षाही सुरस आहेत, अकल्पित आहेत, जिजामाता उद्यानातील पेंग्विनपासून झाली. हायवे बनवणाऱ्या या कंपनीला पेंग्विनसाठीचे बांधकाम करण्याचे कंत्राट दिले. रोमिन छेडाला तब्बल ५७ कंत्राटे देण्यात आली. रोमिनला पेंग्विनपाठोपाठ कोविडच्या कठीण काळात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे कंत्राट देण्यात आले. कोण आहे हा? ”माझे कुटुंब, माझी जबाबदारी. सर्व टेंडर सगे-सोयऱ्यांच्या घरी.. जनतेनं फिरावं दारोदारी.. अशा पद्धतीने काम करणारे लोक जनतेचे कसे भले करू शकतात? रस्ते बनवणाऱ्या कंपनीला ऑक्सिजन पुरवण्याचे काम देऊन या मंडळींनी आरोग्य व्यवस्थेलाच रस्त्यावर आणले आहे. आरोग्यव्यवस्था चोख आहे असे भासवून घरी बसणाऱ्यांनी देशात एक क्रमांकाचे मुख्यमंत्री असे प्रमाणपत्र मिळवले. ते शेवटून पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.