राज्य शासनाच्या वतीने बारामतीमध्ये असलेल्या विद्या प्रतिष्ठान येथील बारा एकरच्या मैदानावर महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी स्थानिक खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि वंदना चव्हाण यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र, या निमंत्रितांच्या यादीमधून राज्यसभेतील खासदार शरद पवार यांना वगळण्यात आले आहे. परंतु शरद पवार (Sharad Pawar) यांनी वेगळीच खेळी करत त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बारामतीमध्ये असलेल्या आपल्या घरी जेवणाचे निमंत्रण दिले आहे.
यासंबंधी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वतीने मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांना अधिकृत पत्र पाठवण्यात आले आहे. बारामतीमध्ये कोणताही कार्यक्रम असल्यास शरद पवार हे आलेल्या पाहुण्यांना आपल्या घरी आवर्जून जेवणासाठी बोलवतात. त्याचप्रमाणे यावेळी त्यांनी मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांना जेवणाचे निमंत्रण दिले आहे. मात्र, आता हे नेते शरद पवार यांचे निमंत्रण स्वीकारतील का? हे पाहावे लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा बारामती जिल्हा दौरा आहे. त्यातच बारामतीमध्ये येणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना शरद पवार (Sharad Pawar) यांनी फोन करून देखील आपल्या घरी जेवणाचे निमंत्रण दिले आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही समावेश आहे. त्यामुळे आता अजित पवार हे शरद पवार यांच्या बारामतीमधील निवासस्थानी जेवणाचे निमंत्रण स्विकारणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.