गडाखांना किती खोके घेऊन मंत्री बनवले होते? संजय शिरसाट यांचे उद्धव ठाकरेंना सवाल

140

छत्रपती संभाजीनगर येथील माविआच्या सभेत गद्दार, खोके याशिवाय आणखी काय बोलणार? माझा त्यांना सवाल आहे. या सभेत त्यांनी स्पष्ट करावे की गडाखांना कॅबिनेट मंत्री का केले? आणखीन दोन अपक्ष आमदारांना मंत्री का केले? बहुमताला आकडा कमी पडत नव्हता. मग किती खोके घेऊन यांना मंत्रीपद दिले? असेच तर नाही देत ना कुणाला मंत्रीपद? तुमच्या पक्षात आले का ते? नाही. तुम्हाला त्यांच्या पाठिंब्याची गरज होती का? नाही. मग खोके किती घेतलेत? आज सभेत बोलताना लोकांना सांगा की होय आम्ही गडाखांना कॅबिनेट मंत्री केले, पण एकही रुपया घेतला नाही हे आम्ही बाळासाहेबांची, देवाची शपथ घेऊन सांगतो, असे आव्हान शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना यांना दिले आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेची जोरदार चर्चा पाहायला मिळत होती. या सभेतून मविआचे नेते आगामी वाटचालीविषयी नेमकी कोणती भूमिका मांडणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले  आहे. त्यातच, रामनवमीच्या पूर्वसंध्येला शहरात निर्माण झालेल्या दंगलसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आजच्या सभेबाबत कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली आहे. याविषयी बोलताना शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान दिले आहे. दुर्दैव हे आहे की, आम्ही त्या उद्धव ठाकरेंना पाहिले आहे जे अमित शाह, नरेंद्र मोदींच्या मांडीला मांडी लावून बसायचे. एक राष्ट्रीय व्यक्तिमत्व उद्धव ठाकरेंचे तयार झाले होते. पण आज शरद पवारांनी त्यांना त्यांची जागा दाखवली. तुम्ही त्या स्तराचे नाही आहात. आज तुम्हाला कोणत्या स्तरावर आणून बसवले आहे? अजित पवार, नाना पटोले यांच्याबरोबर त्यांना सभा घेण्याची गरज पडली आहे. शरद पवार आज नागपूरला आहेत. पण ते का नाही आले? आता उद्धव ठाकरेंना गरज आहे की त्या इतर नेत्यांनी यावे त्यांच्याबरोबर. माझ्या माहितीप्रमाणे ते संध्याकाळी विमानाने सगळे वऱ्हाड घेऊन येणार आहेत, असे संजय शिरसाट म्हणाले. आज संविधानाची शपथ घेणार आहेत. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले, त्यांच्या नातूबरोबर तुमची युती झाली ना? ते प्रकाश आंबेडकर कुठे आहेत? ते का नाहीत स्टेजवर? म्हणजे तुम्हाला जेव्हा गरज असेल, त्या वेळेला तुम्हाला लोकांचा वापर करायचाय. याचा फायदा खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसला होणार आहे. उद्याचा मुख्यमंत्री कोण? हा प्रश्न कुणाला विचारला, तर ते पटकन म्हणतील अजित पवार. उद्धव ठाकरे का नाहीत?, असेही शिरसाट म्हणाले.

(हेही वाचा अखेर केंद्रीय मंत्री राणे यांना ‘त्या’ प्रकरणात न्यायालयाचा दिलासा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.