शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या जाहिरातीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर स्पष्टीकरण दिले आहे. मी आणि देवेंद्र फडणवीस हे जनतेच्या मनात आहे, हे जास्त महत्त्वाचे आहे. कोल्हापूर दौऱ्याआधी ते माध्यमांशी बोलत होते.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये देशात नरेंद्र मोदी तर महाराष्ट्रात शिंदे हे जनतेच्या पसंतीचे असल्याचा दावा करण्यात आला आहे. या जाहिरातीवर भाजपच्या नेत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. सर्वच बाजूने टीकेची झोड उठल्यानंतर या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
आम्ही जनतेच्या मनात आहोत
यासंदर्भात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही जनतेच्या मनात आहोत, हे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. राज्यातील भाजप – शिवसेना युतीचे सरकार हे जनतेच्या मनातील सरकार आहे, असा दावा त्यांनी केला.
सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही
राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असावे, असा जनतेचा कौल होता. त्यानुसार आम्ही शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन केलेले आहे. हे सरकार सत्तेसाठी, पैशासाठी किंवा मला काहीतरी मिळेल यासाठी एकत्र आलेले सरकार नसल्याचे ते म्हणाले. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने काम करत असल्याचे ते म्हणाले. कोणाचा फोटो असल्याने किंवा नसल्याने फारसा फरक पटत नाही, असेही त्यांनी म्हटले.
(हेही वाचा ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले…)
शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय
सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना भरघोस निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. यासाठी आजपर्यंत कधीही निधी देण्यात आलेला नाही. आमच्या सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यासाठी पंधराशे कोटी रुपयांच्या निधीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांत ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’, अशी जाहीरात देत शिंदेसेनेने आज चांगलीच खळबळ उडवून दिली. झी टीव्ही व मॅटराईझ या संस्थेने केलेल्या सर्व्हेवर ही जाहीरात देण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातील 46.4 टक्के जनता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे, असा दावा करण्यात आला आहे. कोणत्याही जाहिरातीत दोघांचे फोटो असतात. आज मला आश्चर्य वाटते की, आज प्रकाशित झालेल्या जाहिरातीमध्ये फक्त ‘देशात मोदी, राज्यात शिंदे’ असे आहे. पण यात देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नाही ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी झेप आहे, अशी खोचक टीका माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली. बाळासाहेबांची शिवसेना असल्याचा आव शिंदेंकडून केला जातो. मग त्यांच्या जाहिरातीमध्ये बाळासाहेबांचा फोटो नाही, ही अतिशय धक्कादायक बाब आहे. एकवेळ फडणवीसांना विसरले तरी चालेल पण बाळासाहेबांना विसरणे बरोबर नाही, असेही ते म्हणाले.
Join Our WhatsApp Community