“जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार, भेदभाव सोनं लुटूया हिंदुत्वाच्या विचारांचं…” दसरा मेळाव्यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे सूचक ट्वीट

174

मुंबईत शिवसेनेचे गुरूवार ५ ऑक्टोबर दोन दसरा मेळावे होणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडली, त्यामुळे यंदा दोन दसरा मेळावे होणार आहेत. मेळाव्याआधी दोन्ही गटांमध्ये ट्विटर आणि टिझर वॉर चांगलेच रंगले आहे. दसरा मेळाव्याआधी मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करत सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

( हेही वाचा : पंतप्रधान मोदींसह प्रमुख नेत्यांनी दिल्या विजयादशमीच्या शुभेच्छा!)

नवी आशा, नवी पहाट, जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार, भेदभाव सोनं लुटुया हिंदुत्वाच्या विचारांचं…. करुनी सीमोल्लंघन साधूयात लक्ष महाराष्ट्राच्या विकासाचं….विजयादशमीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देत करत मुख्यमंत्र्यांनी हे सूचक ट्वीट केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार? कोणावर टीकास्त्र सोडणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विजयादशमी अर्थात दसरा हा आपल्या सर्वांसाठी आनंदाची लयलूट करण्याचा सण. वाईट गोष्टींना दूर करून पुढे जाण्याचा, विजय साजरा करण्याचा क्षण. या सणाकडून प्रेरणा घेऊन आपण महाराष्ट्राला बलशाली करण्यासाठी एकजूट करूया असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, विजयादशमी म्हणजे वाईटावर विजय मिळविल्याचा आनंदोत्सव. कोविडच्या बिकट संकटावर मात केल्यानंतर खऱ्य़ा अर्थानं आपल्या सर्वांसाठी हा आरोग्याचा विजयोत्सवच आहे. या सणाकडून प्रेरणा घेऊन आता आपल्याला पुढे जायचे आहे. बलशाली महाराष्ट्र उभा करायचा आहे. राज्याचा सर्वांगीण विकास हा आमचा ध्यास आहे. महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रातील प्रगतीच्या शिखरांना गवसणी घालावी, अशी आकांक्षा आहे. या विकास पर्वातूनच आपल्या सर्वांच्या आयुष्यात परिवर्तन घडेल, असा विश्वास आहे. या ध्यासपूर्तीसाठी आपण एकजूट करूया असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.