शिवडी-वरळी उन्नतमार्गामुळे बाधित झालेल्यांचे शिरोडकर मंडईत होणार पुनर्वसन

95

शिवडी-वरळी उन्नतमार्ग प्रकल्पातील एल्फिन्स्टन रेल्वे ओंलाडणी पुल बांधकाम बाधित ‘जी’आणि ‘एफ’ साऊथ विभागातील रहिवाशांचे शिरोडकर मंडई येथे पुनवर्सन करण्याचा निर्णय सोमवारी येथे घेण्यात आला. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. ‘या प्रकल्प बाधितांचे शिरोडकर मंडई पुनर्विकास प्रकल्पात उत्तमरीत्या आणि वेळेत पुनर्वसन करण्यात यावे. व्यावसायिक गाळेधारकांसह जास्तीत जास्त प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे अशा रितीने नियोजन करा’, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

( हेही वाचा : ऋतुजा लटके यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ)

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार कालिदास कोळंबकर, सदा सरवणकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त एस.व्ही.आर.श्रीनिवास, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश लोखंडे, माजी आमदार किरण पावसकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, शिरोडकर मंडई पुनर्विकासात या प्रकल्प बाधित रहिवाशांचे आणि व्यावसायिक गाळेधारक यांचे पुनर्वसन करताना, सविस्तर प्रकल्प आराखडा करण्यात यावा. यात जास्तीत जास्त बाधितांचा समावेश करण्यात यावा. इमारतींचे भुसंपादन, रहिवाशांचे करार, मंडई पुनर्विकास प्रकल्पाचा उत्कृष्ट आराखडा याबाबतीत वेळेत कार्यवाही करण्यात यावी. रहिवाशांना द्याव्या लागणाऱ्या भाड्याची महापालिका आणि एमएमआरडीएने चर्चेद्वारे सर्वमान्य अशी निश्चिती करावी. पुनर्वसनाच्या बाधितांच्या अडचणी व म्हणणे विचारात घेण्यात यावे, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

उन्नत मार्गाचे ३१ टक्के काम पूर्ण

मुख्यमंत्री शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी प्रत्यक्ष पाहणी दौरा करून या उन्नत मार्ग प्रकल्पातील बाधितांची भेट दिली होती. त्यातील सुमारे तीनशे कुटुंबांना एमएमआरडीएने घरांच्या चाव्या दिल्याची माहिती आमदार सरवणकर यांनी दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. एमटीएचएल आणि कोस्टल रोड यांना जोडणारा हा उन्नत मार्ग प्रकल्प ३१ टक्के पूर्ण झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.