अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल बंद केल्यामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत आहे. अंधेरी स्टेशन आणि मेट्रो स्थानकाच्या जवळ मोठ्या प्रमाणावर फेरीवाले बसत असल्याने आधीच वाढलेल्या वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे जोपर्यंत पुलाचे काम होत नाही, तोवर हे फेरीवाले हटवून रस्ता मोकळा ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मुंबई पालिका आयुक्तांना दिले. तसेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना या पुलाचे काम लवकरात लवकर, वेळेआधी पूर्ण करण्याची सूचना केली.
( हेही वाचा : T20 World Cup : सेमीफायनलमध्ये भारतासमोर इंग्लंडचे आव्हान; पण टीम इंडियाचे यामुळे वाढलंय टेन्शन)
अंधेरीतील गोखले पूल हा धोकादायक झाल्याने वाहतूक पोलिसांनी तो काही दिवसांपासून पूर्णपणे बंद केला आहे. या निर्णयाची कोणतीही पूर्वकल्पना न दिल्याने अंधेरी पूर्व आणि पश्चिम दोन्ही दिशेला राहणाऱ्या नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कानावर पडताच त्यांनी तातडीने दखल घेतली.
हा पूल बंद झाल्यामुळे अंधेरी पश्चिमेकडील एस व्ही रोड, लिंक रोड, जे पी रोड, इर्ला जंक्शन, शॉपर्स स्टॉप येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. तसेच हा पुल बंद केल्यानंतर वाहतूक पोलिसांनी नवीन सिग्नल यंत्रणा देखील कार्यान्वित केलेली नाही. त्यामुळे अंधेरी शहरात पूर्व आणि पश्चिम आशा दोन्ही दिशेला अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतुकीचे योग्य नियोजन करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे निर्देश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबलसिंह चहल याना दिले आहेत. अंधेरी स्टेशन आणि मेट्रो स्थानकाच्या जवळ मोठ्या प्रमाणावर फेरीवाले बसत असल्याने आधीच वाढलेल्या वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे जोपर्यंत पुलाचे काम होत नाही तोवर हे फेरीवाले हटवून रस्ता मोकळा ठेवावा, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
पुनर्बांधणीला प्राथमिकता द्या
गोखले पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामाला प्राथमिकता देऊन तो लवकरात लवकर आणि शक्य झाल्यास वेळेआधी पूर्ण करावा. त्यासाठी गरज पडल्यास प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा. या कामाचा कोणताही त्रास नागरिकांना होणार नाही, तसेच वाहतुकीचे नियमन सुरळीत व्हावे यासाठी लागणाऱ्या साऱ्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी रेल्वेसह सर्व यंत्रणांना केली आहे.
Join Our WhatsApp Community