कवाडेंना सोबत घेताना मला विचारायला हवे होते; आठवलेंचा मुख्यमंत्र्यांवर आक्षेप

89

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग करून मतदारांना सामोरे जाण्याची योजना उद्धव ठाकरे यांनी आखली असताना, एकनाथ शिंदे यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीसोबत (कवाडे गट) युती करून उद्धवसेनेला शह दिला आहे. मात्र, रिपाईचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या या खेळीवर आक्षेप घेतला आहे. जोगेंद्र कवाडेंना सोबत घेताना मुख्यमंत्र्यांनी मला विचारायला हवे होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

( हेही वाचा : मध्य रेल्वे मार्गावर दोन दिवस विशेष पॉवर ब्लॉक! लोकल गाड्यांवर होणार परिणाम)

आठवले म्हणाले, मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रपरिषद घेत याबाबतची घोषणा केली. पण, जोगेंद्र कवाडे यांना सोबत घेताना एकनाथ शिंदे यांनी माझ्याशी चर्चा करायला हवी होती. त्यांना घेण्याची गरज नव्हती, असे मत आठवले यांनी व्यक्त केले आहे. तसेच येत्या काही दिवसांत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्तारात आमच्या पक्षाला एक मंत्री पद मिळणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘त्या’ निर्णयाचे स्वागत

जैन धार्मियांचे आस्थास्थान असलेल्या सम्मेद शिखरजी तीर्थ स्थळाला केंद्र आणि झारखंड सरकारने पर्यटनस्थळ घोषित केल्याचा निर्णय मागे घेवून तीर्थस्थळ घोषीत करण्यात यावे, या मागणीसाठी सकल जैन समाजाच्या वतीने आंदोलन करण्यातआले होते. आता सम्मेद शिखरच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सम्मेद शिखरला पर्यटन स्थळ बनवण्याच्या निर्णयाला केंद्राने तत्काळ स्थगिती दिली आहे. जैन समाजाच्या मागणीनंतर केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. जैन समाजाच्या पाठीशी नेहमी उभे राहणार असल्याचेही आठवले यावेळी म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.