यंदाच्या गणेशोत्सवात पहिल्या दिवसापासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थ हे कायम चर्चेत आले आहे. श्री गणेशाच्या दर्शनासाठी भाजपचे नेते राज ठाकरे यांच्या घरी जात आहेत, गणपतीच्या पहिल्या दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेतली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी भेट घेतली, त्यानंतर दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
केवळ सदिच्छा भेट होती
तब्बल पाऊण तास मुख्यमंत्री शिंदे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सगळीकडे गणपतीचे आगमन झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्ताने आम्ही एक दुसऱ्याकडे जात असतो, आज राज ठाकरे यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली. मध्यंतरी त्यांचे ऑपरेशन झाले होते, आज त्यांच्या घरी गणपती आले आहे. त्यानिमित्ताने त्यांची भेटही घेण्यासाठी आलो. ही राजकीय भेट नाही. त्यांच्याशी बोलतांना दिघे साहेबांच्या आठवणीही चर्चेत आल्या. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आम्ही सगळ्यांनीच बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे. आपल्याला जी संधी मिळाली आहे तिचे सोने शिवसेना-भाजपचे सरकार करेल, सर्वसामान्यांच्या हिताला आम्ही प्राधान्य देणार आहोत. आज कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
(हेही वाचा पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात, तेव्हा…; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा)
Join Our WhatsApp Community