शिंदे गट आणि भाजपा सरकारने सोमवारी, ४ जुलै रोजी बहुमत प्रस्ताव जिंकला. सरकारच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भरभरून उत्स्फूर्तपणे बोलले. हे सरकार हिंदुत्वाच्या विचारांवर स्थापन झाले आहे, असे म्हटले. अधिवेशन आटोपल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हुतात्मा स्मारकाला वंदन केले. त्यानंतर दादर येथे चैत्यभूमी आणि स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. मात्र तिथेच असणाऱ्या हिंदुत्वाचे प्रणेते असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे प्रेरणास्रोत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट देण्यास विसरले. त्यामुळे सावरकर प्रेमींसह हिंदुत्ववाद्यांनी काहीसी नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री शिंदे हे दादर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या जवळ असलेल्या दोन ठिकाणी आले, त्यावेळी ते स्मारकात येऊन वीर सावरकर यांना अभिवादन करतील, अशी अपेक्षा होती. त्यासाठी सावरकरप्रेमी स्मारकात त्यांची प्रतीक्षा करत होते. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी अपेक्षाभंग केला. त्यामुळे आता तरी मुख्यमंत्री शिंदे यांनी विशेष वेळ काढून स्मारकाला भेट द्यावी.– पंकज भोसले, सावरकर प्रेमी.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या वागण्यात विरोधाभास
ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाड्यांचा ताफा हा दादर येथे सावरकर स्मारकाच्या जवळ आला. तेव्हा मुख्यमंत्री शिंदे यांनी चैत्यभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचेही दर्शन घेतले. मात्र तेथून काही पावलांवर असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट देण्यास मात्र विसरले. त्यामुळे हिंदुत्ववादी आणि वीर सावरकरप्रेमी यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे. काही तासांपूर्वी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदुत्वाच्या विषयावर आक्रमकपणे बोलले. ‘आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार घेऊन चालत आहोत. पण शिवसेनेने हिंदुत्वाला विरोध करणा-या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सूत जमवले. त्यामुळे ते आम्हाला सहन होत नव्हते. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी बंड, उठाव करावा, ही बाळासाहेबांची शिकवण आहे. पण गेल्या अडीच वर्षांत आम्हाला खूप वाईट अनुभव आला. काँग्रेससोबत असल्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत बोलता येत नव्हते. काँग्रेसने आपल्या ‘शिदोरी’ या मुखपत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केली, तरी आम्हाला गप्प बसावे लागले’, अशी खंत मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली होती. मुख्यमंत्री शिंदे मात्र जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे प्रेरणास्रोत असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या जवळ आले, तरीही वीर सावरकर यांना अभिवादन करण्यासाठी स्मारकात आले नाहीत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वागण्यातील हा विरोधाभास सर्वांच्या भुवया उंचावणारा होता.
(हेही वाचा मविआत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत बोलता येत नव्हतं, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत)
Join Our WhatsApp Community