पांढऱ्या रंगाचेच कपडे का, दाढी का ठेवता.. ? मुलांचे कुतूहल, अन् मुख्यमंत्र्यांची खुमासदार उत्तरे

94

परळच्या डॉ. शिरोडकर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना सोमवारी बालदिनाची अनोखी भेट मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्यक्षात शाळेत आले, त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या, त्यांच्या मनातल्या प्रश्नांना थेट उत्तरे दिली. सुमारे तासभर चाललेल्या या बालदिनाच्या अनोख्या सोहळ्यात मुख्यमंत्री मुलांसोबत रमले. पांढऱ्या रंगाचेच कपडे का घालता, दाढी का ठेवता, शिक्षकांचा मार खाल्ला होता का…, मुलांनी विचारलेल्या या भन्नाट प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी खुमासदार उत्तरे दिली.

( हेही वाचा : 7th Pay Commission : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लवकरच लागू होणार?)

बालदिनाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, एक विद्यार्थी म्हणून मी आज इथे माझ्या शाळेतल्या आठवणी जागवायला आलो आहे. बालपण महत्वाचे असून, त्यातला निरागसपणा सर्वांनी जपावा. मोठे झाल्यावर जबाबदाऱ्या येतात. त्यामुळे लहानपण देगा देवा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. अभ्यास करताना दडपण घेऊ नका असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

शिक्षकांचा मार खाल्ला का..?

मुख्यमंत्री शिंदे यांना मुलांनी बिनधास्तपणे मनातले प्रश्न विचारले. त्यांनी तितक्याच मोकळेपणाने उत्तरे दिली. एका विद्यार्थीने मुख्यमंत्र्यांना आई-बाबांचा, शिक्षकांच्या हातचा मार खाल्ला का, असा प्रश्ना विचारल्यावर मुख्यमंत्री हसले आणि त्यांनी ठाण्यातील किसननगर मधील महापालिकेच्या शाळा क्रमांक २३ मधील आठवणी सांगितल्या. रघुनाथ परब नावाचे शिक्षक कसे शिक्षा करायचे, याचा अनुभव सांगतानाच लहानपणापासून दुसऱ्याला मदत करण्याची आवड होती. समाजकारणातून राजकारणात आल्याचे त्यांनी उत्तरात सांगितले.

लग्नासाठी काढली दाढी…

तुम्ही दाढी का नाही करत, असा प्रश्न विचारल्यावर माझे गुरू धर्मवारी आनंद दिघे दाढी ठेवायचे, त्यामुळे मी देखील दाढी ठेवली. लग्नाच्या वेळेस दाढी काढल्याचे सांगतानाच दाढीची कमाल आणि किमया सगळ्यांना माहित असल्याचे मुख्यमंत्री मिष्कीलपणे म्हणाले. मला पांढरा रंग आवडतो कारण, तो सगळ्या रंगात सामावून जातो, असे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. मुख्यमंत्री आपल्यातलेच एक होऊन गप्पा मारताहेत हे पाहून चिमुकल्यांनी निरागसपणे त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फी घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली.

मैदानी खेळ खेळा

मला फुटबॉल, क्रिकेट खेळायला, पाहायला आवडतात. मैदानी खेळ नेहमी खेळायचो. आता मोबाइलच्या जमान्यात देखील विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. विद्यार्थी भविष्य असून ते या देशाचे, राज्याचा पाया आहेत. विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्याचा दर्जा उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.