मंत्रालयात सत्यनारायणाच्या पुजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वीकारणार पदभार, CMO मध्ये सजावट

142

राज्यात गेल्या १५ दिवसांच्या अनेक राजकीय धक्कादायक घडामोडी आणि मोठ्या सत्तासंघर्षानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिकृतपणे मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयात पदभार स्वीकारणार आहेत. मंत्रालयात सत्यनारायणाची पूजा करून एकनाथ शिंदे आज राज्याचा रिमोट प्रत्यक्षरित्या हातात घेणार आहे.

(हेही वाचा – बूस्टर डोससाठी प्रतीक्षा कालावधी झाला कमी! सरकारचा मोठा निर्णय)

दरम्यान, आज मुख्यमंत्री कार्यालयात पूजा ठेवली असल्याने पहाटेपासून त्याची जय्यत तयार सुरू आहे. मंत्रालयातील प्रवेशद्वार आणि मुख्यमंत्री कार्यालयाला फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे. यासह मुख्यमंत्री दालनात बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा मुख्यमंत्री बसणार असलेल्या खुर्चीच्या मागे तर त्यांच्या डाव्या बाजूला आनंद दिघे यांची प्रतिमा लावण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यादरम्यान शिंदे गट हीच बाळासाहेबांची शिवसेना असे सांगण्याचा प्रयत्न देखील शिंदे गटातील आमदारांकडून केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

मंत्रालयात सत्यनारायणाच्या पुजेनं नव्या सरकारचा ‘श्रीगणेशा’ करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील पूजेसाठी शिंदे समर्थक आमदारही उपस्थित राहणार आहेत. यासह आमदार यामिनी जाधव, सदा सरवणकर, दीपक केसरकर असे आमदार मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचले आहेत. यावेळी मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.