गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील नेते आणि त्यांचे अयोध्या दौरे हा विषय नेहमीच चर्चेत आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच अयोध्येतील रामलल्लाचे दर्शन घेणार असल्याचे सांगितले जात आहे. केवळ एकनाथ शिंदेंच जाणार नसून ते त्यांच्यासह त्यांच्या सर्व आमदारांना घेऊन अयोध्येला घेऊन जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच या दौऱ्याचे नियोजन करण्यात येणार आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे आपल्या सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार असल्याने आतापासून चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.
(हेही वाचा – शेतकरी कुटुंबियांसह मुख्यमंत्र्यांची दिवाळी; म्हणाले, “धीर सोडू नका…”)
अयोध्येतील हनुमान गढीचे प्रमुख महंत राजूदास महाराज हे गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यामुळे शिंदे दिवाळीनंतर या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
यावेळी शिंदे शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता असून नोव्हेंबर महिन्यात जाणार शिंदे आणि बाळासाहेबांची शिवसेना या गटाचे आमदार अयोध्येत दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या या दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित नसून महापालिका निवडणुकीपूर्वीच हा दौरा होणार असल्याचेही सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community