अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेतेही सत्तेत सहभागी झाले. राष्ट्रवादी सत्तेत आल्यामुळे एकनाथ शिंदे गटात नाराजी पाहायला मिळत असून मुख्यमंत्री शिंदे लवकरच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील अशी चर्चा रंगू लागली आहे. मात्र शिंदे गटातील नाराजीमागील मुख्य कारण हे ‘वित्त’ खातं असल्याचं समोर येत आहे.
(हेही वाचा – “माझ्या राजीनाम्याच्या बातम्या अफवा आहेत; मीच मुख्यमंत्री राहणार” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)
‘वित्त’ विभागामुळे सेना आमदारांचे पित्त खवळले…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर खाते वाटपावरून शिवसेना आणि त्यांच्या आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणात खदखद वाढली होती आणि याच पार्श्वभूमीवर बुधवार ५ जुलै रोजी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये मंत्रिपदाची अपेक्षा बाळगून असणाऱ्या काही आमदारांनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारत राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत सामावून घेतांना आपला विचार का घेतला नाही. भाजप बरोबर आपण देखील सत्तेत आहोत हे ते विसरले आहेत का अशा प्रकारचे प्रश्न देखील करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वित्त विभाग मिळणार यावरून शिवसेनेच्या आमदारांचे पित्त खवळले असल्याचेही दिसून आले. महाविकास आघाडीमधून बाहेर पडून शिवसेना आमदारांनी अजित पवारांवर दुजाभाव करत असल्याचा आरोप देखील लावला होता. त्यामुळे पुन्हा त्यांच्याकडेच वित्त विभाग जाणारा असेल तर आम्ही जनतेला काय उत्तर द्यावी, कोणत्या तोंडाने मतं मागावी अशा प्रकारचे प्रश्न देखील या बैठकीत उपस्थित झाल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community