मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी काळजी करू नये! मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला.

121

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या  शेतकऱ्यांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत त्यांना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 

मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदत व पुनर्वसन विभागाकडून घेतला. कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवावी, असे निर्देश त्यांनी दिले. काही ठिकाणी पुराच्या पाण्यातून जवानांनी ग्रामस्थांची सुटका केली आहे, तसेच या भागातून लोकांचे स्थलांतर व्यवस्थित व्हावे असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांशी देखील चर्चा केली असून या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने नागरिकांच्या बचाव कार्यावर लक्ष द्यावे तसेच सर्व यंत्रणांत समन्वय ठेवावा असे सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी काल सायंकाळी आणि आज सकाळी देखील मराठवाड्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्र्यांशी या परिस्थितीवर चर्चा केली. मुख्य सचिव सीताराम कुंटे तसेच मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनाही त्यांनी सूचना दिल्या. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात २६ मिमी पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने विशेषत: मराठवाड्यातले जिल्हे प्रभावित झाले आहेत.

(हेही वाचा : जयंत पाटलांच्या कामाचा असाही सपाटा, झोपेचाही पडला विसर)

नुकसानीचे पंचनामे सुरू करा

सध्या बचाव व तातडीच्या मदत कार्यास वेग द्यावा व महसूल विभाग, कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत, सततच्या पावसामुळे काही ठिकाणी फळबागांचेही नुकसान झाले आहेत, शेतपिक वाहून गेले आहेत, ही अभूतपूर्व परिस्थिती आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

हेलिकॉप्टर, बोटींनी सुमारे शंभर जणांना वाचवले

यावेळी एनडीआरएफ जवानांनी तसेच स्थानिक पोलिस यंत्रणेने उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, यवतमाळ भागातील सुमारे शंभर जणांना वाचविले. याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. उस्मानाबादमधून १६ जणांना हेलिकॉप्टरने, तर २० जणांना बोटीने वाचविले. लातूरमध्ये ३ जणांना हेलिकॉप्टरमधून तर ४७ जणांना बोटीतून वाचविले. यवतमाळ आणि औरंगाबादमधून अनुक्रमे २ आणि २४ जणांना वाचविण्यात यश मिळाले, अशी माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

एनडीआरएफ बचाव कार्यात

एनडीआरएफचे १ पथक उस्मानाबाद आणि १ पथक लातूरमध्ये असून हवाई दलाचं हेलिकॉप्टर या दोन जिल्ह्यांत बचाव कार्य करीत आहे, याविषयीही मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या.

१७ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान – विजय वडेट्टीवार 

औरंगाबादमध्ये २४ जणांना वाचविण्यात यश आले. या महिन्यात ७१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर २६ जण जखमींची नोंद झाली आहे. ५७ जनावरांचा मृत्यू, तर मोठी १९६ जनावरे दगावली. १७ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान गुलाब चक्रीवादळ सोडून झाले. ८१ टक्केच पंचनामे झाले आहेत.२२ लाख हेक्टर जमीन आणि शेतक-यांचे नुकसान झाले. प्रचंड असे नुकसान आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. रस्त्यांचे खूप मोठे नुकसान आहे. जमिनी खरडून गेल्या. मोठ्या प्रमाणात कोल्हापूर बंधारे फुटले. शेती पंप वाहून गेले. काही ठिकाणी ४ वेळा तर काही ठिकाणी ८ वेळा अतिवृष्टी झाली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.